नांदगाव खंडेश्वर /तालुका प्रतिनिधी
महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन २९ ऑगस्ट हा दिवस देशभरात राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो.भारताचा समृद्ध क्रीडा वारसा जपण्या सोबतच राज्यातील क्रीडा व खेळाचा प्रचार-प्रसार व्हावा,शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकां मध्ये क्रीडा विषयी जागृती निर्माण व्हावी आणि निरोगी जीवन शैलीचा संदेश जनमानसा पर्यंत पोहोचावा,या उद्देशाने अमरावती जिल्ह्यात विविध क्रीडा व तंदुरुस्ती विषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.
भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयाच्या तसेच क्रीडा व युवक सेवा संचालनालय,महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार राष्ट्रीय क्रीडा दिन 2026 ची संकल्पना ‘खेळेल भारत, जिंकेल भारत’ अशी असून, ‘आदर,खेळ आणि हालचाल’ या तीन प्रमुख स्तंभांवर आधारित विविध कार्यक्रम.जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,अमरावती आणि गुरुकुल एज्युकेशन सोसायटी नांदगाव खंडेश्वर द्वारा संचालित स्कूल ऑफ स्मार्ट किड्स नांदगाव खंडेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने 29 ऑगस्ट हा दिन राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या प्रारंभी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून शाळेचे मुख्याध्यापक अय्युब शाह सर यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री बळवंत रामटेके सर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त क्रीडाशिक्षक सोनल रंगारी सर यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षक गण यांना क्रीडा शपथ देण्यात आली.कार्यक्रमात शाळेचे शारीरिक शिक्षण शिक्षक सोनल रंगारी सर यांनी विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षण,नियमित व्यायाम, विविध क्रीडा प्रकारांचे महत्त्व तसेच निरोगी व शिस्तबद्ध जीवनशैली याबाबत मार्गदर्शन केले. क्रीडा क्षेत्रामुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकासाला चालना मिळते,असे त्यांनी सांगितले.विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा स्पर्धा मध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रमाचा आनंद घेतला.त्यामुळे संपूर्ण शाळेच्या परिसरात उत्साहाचे आणि क्रीडामय वातावरण निर्माण झाले होते.“खेळेल भारत, जिंकेल भारत!” या प्रेरणादायी संदेशातून विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात प्रगती करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले.राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड, संघभावना, शिस्त, आत्मविश्वास आणि निरोगी जीवनशैली यांचा संदेश पोहोचविण्यात आला.कार्यक्रमां मध्ये शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी तसेच विद्यार्थ्यांनी सदर कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन उत्साहात कार्यक्रम पार पाडला. शाळेमध्ये घेण्यात आलेल्या विविध क्रीडा स्पर्धामध्ये प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अमरावती तर्फे प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
