इ.स. १३०३ पासूनची परंपरा; बलुचिस्तानातून वऱ्हाडात देवीच्या आगमनाचीआख्यायिका
नवरात्रोत्सवात हजारो भाविकांची मांदियाळी.
भगत कुटुंबाची पिढ्यान्पिढ्यांची अविरत सेवा
नांदगाव खंडेश्वर / उत्तम ब्राम्हणवाडे
अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील हिंगलासपूर हे गाव धार्मिक आणि ऐतिहासिक वारशासाठी विशेष ओळखले जाते. गावातील ज्वालामुखी हिंगलाज माता मंदिर हे केवळ श्रद्धेचे केंद्र नसून, प्राचीन स्थापत्य,आख्यायिका, लोकपरंपरा आणि पिढ्यान्पिढ्या सुरू असलेल्या भक्तीचा अनोखा संगम आहे.
भुईकोट किल्ल्यासारखी दिसणारी मंदिराची रचना, भक्कम परकोट व जुने बुरुज आजही या देवस्थानाच्या प्राचीन वैभवाची साक्ष देतात.हिंगलाज माता ही पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतातील हिंगोल नदी परिसरातील प्राचीन हिंगलाज शक्तीपीठाशी संबंधित असल्याची धार्मिक आख्यायिका सांगितली जाते. दुर्गम भागामुळे देवीची पूजा करण्यासाठी भक्तांची संख्या कमी असल्याने माता वऱ्हाडात आल्याचे स्थानिक परंपरेत सांगितले जाते. त्यानंतर विदर्भातील या भूमीत देवीच्या उपासनेची परंपरा रुजली.
अमृतगिर महाराजांच्या तपश्चर्येपासून हिंगलासपूरपर्यंतचा प्रवास
स्थानिक आख्यायिकेनुसार वऱ्हाड असलेला परिसर घनदाट जंगलाने व्यापलेला होता. याच परिसरात श्री अमृतगिर महाराज देवीची कठोर तपश्चर्या करीत होते. त्यांच्या भक्तीने प्रसन्न झालेल्या हिंगलाज मातेने या भूमीत वास्तव्य केल्याचे सांगितले जाते.अमृतगिर महाराजांचे परमभक्त चिंतामणजी अर्थात चिमणाजी भगत यांच्या भक्तीमुळे देवीचे वास्तव्य पुढे हिंगलासपूर येथे झाले. सुमारे इ.स. १३०३ च्या आसपास येथे मंदिराची स्थापना झाल्याची स्थानिक मान्यता आहे. देवीच्या नावावरूनच गावाला ‘हिंगलासपूर’ हे नाव प्राप्त झाल्याचेही सांगितले जाते.

या मंदिराशी संबंधित इतिहास आणि आख्यायिका आजही स्थानिकांच्या स्मृतीत जिवंत आहेत. श्रद्धा आणि परंपरेमुळे हे देवस्थान परिसरातील भाविकांसाठी विशेष महत्त्वाचे मानले जाते. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील हिंगलासपूर येथे
किल्ल्यासारखी मंदिराची रचना
दिसून येते. हे गाव लोणी टाकळी पासून अवघ्या काही अंतरावर असून हिंगलासपूर येथे हिंगलास मातेचे अत्यंत पुरातन व जागृत असे मंदिर असून हिंगलाज माता मंदिराचे सर्वात वेगळे वैशिष्ट्य म्हणजे त्याची स्थापत्य रचना. सामान्य मंदिरांपेक्षा वेगळी दिसून येते.ही वास्तू एखाद्या भुईकोट किल्ल्याप्रमाणे भासते. मंदिराभोवती उभारण्यात आलेला पाषाणी परकोट, भव्य किल्याचे असलेले प्रवेशद्वार आणि मोठे बुरुज यामुळे या मंदिराला ऐतिहासिक वास्तूचे स्वरूप प्राप्त झाले आहे.प्राचीन काळात मंदिर तसेच परिसराच्या संरक्षणाच्या दृष्टीने परकोट आणि बुरुज उभारण्यात आल्याचे सांगितले जाते. काळाच्या ओघात अनेक बदल झाले असले तरी मंदिराच्या वास्तूतून प्राचीन काळाची झलक आजही पाहायला मिळते.मंदिराच्या परिसरात हिंगलाज मातेबरोबरच श्री गणेश, विठ्ठल-रखमाई, खंडोबा, महादेव आणि हनुमान यांची मंदिरे आहेत. मंदिराचे संस्थापक चिंतामणजी भगत यांची समाधी व मूर्तीही येथे असल्याने या परिसराला धार्मिक तसेच ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

भगत कुटुंबाची पिढ्यान्पिढ्यांची सेवा.
हिंगलाज माता मंदिराची आणखी एक महत्त्वाची परंपरा म्हणजे भगत कुटुंबाची देवीप्रती असलेली अविरत सेवा. मंदिराचे संस्थापक चिंतामणजी भगत यांच्यापासून त्यांच्या वंशजांनी पिढ्यान्पिढ्या मातेची सेवा आणि पूजा-अर्चा सुरू ठेवली आहे.नऊ पिढ्यांहून अधिक काळापासून ही सेवा परंपरा सुरू असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जाते. त्यामुळे मंदिरातील धार्मिक विधी,उत्सव आणि परंपरांमध्ये भगत कुटुंबाची भूमिका आजही महत्त्वाची आहे.
नवरात्रात भक्तीचा जागर
शारदीय नवरात्रोत्सव हा हिंगलाज माता मंदिरातील प्रमुख धार्मिक सोहळ्यांपैकी एक आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांत मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या काळात अमरावती जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भातील विविध भागांतून भाविक दर्शनासाठी हिंगलासपूर येथे दाखल होतात.विशेषतः अष्टमीच्या दिवशी होणाऱ्या होम-हवनाला धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते. या दिवशी मंदिर परिसरात भक्तांची मोठी गर्दी होते. देवीच्या दर्शनासाठी आणि धार्मिक विधींमध्ये सहभागी होण्यासाठी दूरवरून भाविक येथे येतात.नवरात्रोत्सवाबरोबरच हनुमान जयंतीच्या निमित्तानेही येथे मोठी यात्रा भरते. धार्मिक कार्यक्रमांसोबतच विविध सांस्कृतिक उपक्रमांमुळे या यात्रेला परिसरात विशेष महत्त्व आहे. हिंगलासपूर येथील हिंगलाज माता मंदिर हे विविध समाजांसाठी श्रद्धेचे आणि कुलदैवताचे स्थान मानले जाते. विशेषतः भावसार क्षत्रिय आणि शिंपी समाजातील अनेक कुटुंबांचे हे प्रमुख कुलदैवत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे धार्मिक सण-उत्सवांबरोबरच कौटुंबिक धार्मिक परंपरांमध्येही हिंगलाज मातेचे स्थान महत्त्वाचे आहे.हिंगलासपूरची हिंगलाज माता ही श्रद्धा,इतिहास आणि स्थापत्याचा अनोखा वारसा जपणारे देवस्थान आहे. सुमारे सातशे वर्षांहून अधिक काळाची परंपरा, देवीच्या आगमनाची आख्यायिका, किल्ल्यासारखी रचना, पिढ्यान्पिढ्यांची सेवा आणि नवरात्रातील भक्तांची मांदियाळी यामुळे हे मंदिर केवळ स्थानिकांचे नव्हे, तर संपूर्ण विदर्भाच्या धार्मिक-सांस्कृतिक वारशातील एक महत्त्वाचे स्थान ठरते.नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचे आणि जागृत देवी मंदिर म्हणून हे मंदिर ओळखल्या जाते. या मंदिराचा मोठ्या प्रमाणात जीर्णोद्धार करण्यात आलेला असून दिवसेदिवस येथे दर्शनाला येणाऱ्या भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढतच असल्याने प्रत्येकांनी एकदा तरी या देवीचे दर्शन घेतले पाहिजे.बडनेरा येथून लोणी टाकळी मार्गाने हिंगलासपूर येथे जाण्याकरिता मोठ्या प्रमाणात वाहनाची व्यवस्था असून यवतमाळ मार्गाने येणाऱ्या भाविकांकरीता नांदगाव खंडेश्वर येथून व्यवस्था असून बडनेरा मार्गाने सुद्धा ते दर्शनास जाऊ शकतात.
