अश्विन महिना सुरू होताच वेध लागतात नवरात्र उत्सवाचे.
सुमारे ७०० वर्ष पुरातन जागृत देवी.
नांदगाव खंडेश्वर/ उत्तम ब्राम्हणवाडे
अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथून अवघ्या सहा कि.मी.अंतरावर असलेल्या खंडाळा खुर्द येथील सुमारे ७०० वर्ष पुरातन आणि जागृत असलेल्या श्री रेणुका माता मंदिरात नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.
खंडाळा खुर्द या गावाच्या सुरुवातीलाच असलेले श्री रेणुका देवी मंदिर नवरात्रात भक्तगणांनी फुलून गेलेले असते. गावाचे आराध्यदैवत असलेल्या श्री रेणुका माता मंदिर मोठे विलोभनीय दिसते. देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक पीठ असलेले माहूर या देवीचे मूळ रूप स्वरूप आहे. भक्तांच्या हाकेला धावून जाणारी व भक्तांची इच्छापूर्ती करणारी देवी असे भाविकामध्ये स्थान निर्माण करणारी श्री रेणुकादेवी आहे. एक जागृत देवस्थान म्हणून नांदगाव खंडेश्वर तालुक्यात व परिसरात हे मंदिर ओळखले जाते. मंदिराच्या गाभार्यात सुंदर असा देवीचा तांदळा (मुखवटा) आहे. देवीच्या चेहऱ्यावर तेजपुज्य व मनमोहक असे भाव दिसतात. मंदिरात प्रवेश केल्यानंतर मन प्रसन्न होते, प्रफुल्लीत होते. रेणुकामातेचे मूळ स्वरूप ३३ कोटी देवांची माता आदी माता आहे म्हणून तिने आपला पुत्र परशुरामास फक्त अर्धमुखातून दर्शन दिले याच कारणामुळे या देवीचे मुख तांदळाचे आहे. देवीचा शेंदूरमय तांदळा हाच ओंकार-स्वरूप कल्याणकारक आहे.

रेणुका देवीची माहिती स्कंद पुराणात सांगितली आहे की, रेणुका देवीचा जन्म हा आरंभाच्या युगात म्हणजे त्यास कृतयुग म्हणतात. या काळात रेणु नावाचा राजा होता. त्या राजाने एक यज्ञ केला त्या यज्ञातून अग्नी नारायणाने प्रसाद म्हणून एक कन्या अर्पण केली. या कन्येचे नाव रेणुका असे ठेवण्यात आले त्या मुलीचे स्वयंवर रचले गेले. या स्वयमवरा मध्ये राजे-महाराजे, ब्राह्मण अनेक प्रकारच्या विद्वानांना आमंत्रित केले. या आमंत्रितामध्ये विद्वान,गुणवान,सर्वज्ञ,अष्टपैलू आशा जमदग्रीशी रेणुकाचे स्वयंवर पार पडले. परंतु हा विवाह जातीवंत राजे इतर लोकांना मान्य झाला नाही.कारण मुलगी राजकन्या व मुलगा साधा ब्राह्मण होता. त्यांना अपमान वाटू लागला. पुढे त्यांच्यात युद्ध झाले या घनघोर युद्धात शेवटी जमदग्रीचा विजय झाला. पुढे त्यांना पाच मुले झाली त्यापैकी परशुराम एक. परशुराम अतिशय जिद्दी व धाडसी होता.परशुरामाने वडिलांची आज्ञा घेऊन शिव व श्रीगणेश यांची घोर तपश्चर्या करून शस्त्रे मिळवली.पुढे एके दिवशी रेणुकामातेने परशुरामाला आज्ञा केली कि पृथ्वीवरील सर्व तीर्थ एकाच जागी असलेल्या जागेवर माझी प्राणप्रतिष्ठापना कर.परशुरामाने आईच्या आज्ञेनुसार सिंह पर्वतावरील श्रीक्षेत्र माहूर येथे देवीची स्थापना केली.रेणुका माता म्हणजे जगात अवतरून साध्वी,सती,पतीव्रता असल्यामुळे तिला त्रिलोकातील देव-दानव गंधर्व व अप्सरा सुद्धा देवीचा जयजयकार करतात. खंडाळा खुर्द येथिल रेणुका माता ही या मंदिरात सभामंडपाच्या बाजूला स्थानापन्न असून ती स्वयंभू आहे.अश्विनी शुद्ध नवमीच्या दिवशी मंदिराचे पुजारी ध्यानेश्वर महाराज आमडारे यांचे हस्ते मंत्रोच्चाराने यज्ञ करण्यात येतो. या यज्ञविधीत मंदिरातील सभामंडप भक्त जणांनी फुलून गेलेला असतो. भाविक भक्त आपल्या इच्छा अपेक्षांची पूर्ती करण्याच्या दृष्टीने श्रद्धापूर्वक या यज्ञकुंडात श्रीफळाच्या स्वरूपाने आहुती देतात.मंदिरात नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नवरात्रात नऊ दिवस भाविक उपवास ठेवतात तर काही स्त्रिया ज्यांनी नवस केला आहे त्या नऊ दिवस धरून मंदिरात बसतात. त्यांची व्यवस्था श्री रेणुकादेवी मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात येते.या मंदिरात दररोज सकाळी पाच वाजता देवीची पूजा,सहा वाजता आरती,दुपारी भजन प्रवचन व रात्री सात वाजता श्री रेणुका देवीची महाआरती करण्यात येते.नवरात्र उत्सवामुळे मंदिराचे वातावरण अतिशय मंगलमय झालेले असते. भाविकात उत्साहाचे वातावरण असते. दसऱ्याला देवीभक्त हे त्या ठिकाणी (सोन्याची) आपट्याची लय लूट करून देवीच्या अंगावर टाकून दर्शन घेऊन भाविक धन्य होतात आणि देवीच्या नामाचा जयघोषात करतात नवरात्र उत्सवाला शारदोत्सव म्हणून साजरे करतात. येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.त्यामुळे भक्तांचा उत्साह द्विगुणित होतो. अत्यंत जागृत असे मंदिर असल्याने याठिकाणी भाविकांची गर्दी दिवसेदिवस वाढत चाललेली आहे. अशा प्रसन्न वातावरणात भक्तजन रेणुकामातेचे दर्शन घेऊन सोने आपट्याची लूट करून घरी आनंदाने परततात. असा हा खंडाळा खुर्द येथील नवरात्र महोत्सव.
मंदिर बांधकामाला सढळ हाताने मदतीचे आवाहन.
खंडाळा खुर्द येथील सुमारे ७०० वर्ष पुरातन अशा श्री रेणुका माता मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू असून या परिसरातील भक्तांनी या कामात चांगले योगदान पण केले आहे, अजून पुढील कामासाठी देवी भक्तांनी यात आर्थिक स्वरूपात योगदान करण्याचे आवाहन मंदिर समितीच्यावतीने ध्यानेश्वर महाराज आमडारे यांनी केले आहे.
आई राजा उदो उदो……
