तहसील कार्यालयात मोजक्याच कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त भार.
निराधारांच्या मानधनासह नागरिकांची कामे रखडली.
नांदगाव खंडेश्वर / उत्तम ब्राम्हणवाडे
नांदगाव खंडेश्वर येथील तहसील कार्यालयात विविध महत्त्वाची पदे ही अनेक वर्षांपासून रिक्त असल्याने महसूल प्रशासनाचा कारभार अडचणीत आला आहे. मोजक्याच अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून संपूर्ण तालुक्याचा कारभार सुरू असल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा मोठा बोजा पडला आहे. परिणामी विद्यार्थी, शेतकरी,वृद्ध,दिव्यांग आणि सर्वसामान्य नागरिकांना विविध शासकीय कामांसाठी विलंबाचा सामना करावा लागत आहे.
तहसील कार्यालयातील अनेक कामे प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरोशावर सुरू आहेत. एका अधिकाऱ्याकडे अतिरिक्त विभागाची जबाबदारी असल्याने मूळ कामासोबत अतिरिक्त कामकाजही सांभाळावे लागत आहे.त्यामुळेअधिकारी-कर्मचारी कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करत असले तरी अपुऱ्या मनुष्यबळामुळे कामकाजावर परिणाम होत आहे.विशेषतः संजय गांधी निराधार योजना विभागातील नायब तहसीलदाराचे पद हे अनेक वर्षांपासून रिक्त असल्याने तालुक्यातील हजारो निराधार, दिव्यांग आणि वृद्ध लाभार्थ्यांच्या मानधनाशी संबंधित कामांचा प्रश्न गंभीर बनला आहे.अनेक लाभार्थ्यांसाठी शासनाकडून मिळणारे मानधन हा जगण्याचा आधार असताना संबंधित विभागाचे महत्त्वाचे पद रिक्त राहणे ही चिंतेची बाब आहे.तहसील कार्यालयातील रिक्त पदांमध्ये निवडणूक नायब तहसीलदाराचे पदसुद्धा रिक्त असून संजय गांधी निराधार योजना नायब तहसीलदाराचे पदही रिक्त असुन,पुरवठा निरीक्षन अधिकाऱ्याचे एक पद आणि शिपायांची दोन पदे रिक्त आहेत. तसेच मंडळ अधिकाऱ्यांची दोन पदे रिक्त असून मगरुळ चव्हाळा व पापळ येथे ही पदे रिक्त आहेत.ग्राम महसूल अधिकाऱ्यांची येवती,कणी मिर्झापूर,सालोड, शिवरा आणि कोहळा जटेश्वर येथील पदे रिक्त आहेत. त्याशिवाय धामक,मांजरी,कणी मिर्झापूर,कोठोडा आणि धानोरा फसी येथील कोतवाल पदेही रिक्त असल्याची माहिती आहे.रिक्त पदांचा परिणाम केवळ कार्यालयीन कामकाजापुरता मर्यादित नसून त्याचा थेट फटका नागरिकांना बसत आहे. विविध दाखले,महसूलविषयक कामे, शासकीय योजनांशी संबंधित प्रक्रिया,पुरवठा विभाग, निवडणूकविषयक कामे तसेच निराधार योजनेच्या कामांसाठी नागरिकांना तहसील कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत असल्या नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.दरम्यान रिक्त पदांचा अतिरिक्त भार कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांवर पडत असल्याने त्यांच्यावरही कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे हे अधिकारी, कर्मचारी दुसरीकडे बदलीच्या मानसिकतेत असल्याचे दिसून येते.रिक्त पदांचा प्रश्न तातडीने सोडविणे आवश्यक असून या संपूर्ण परिस्थितीकडे जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांनी तातडीने लक्ष देऊन नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयातील रिक्त पदे तातडीने भरण्याची कार्यवाही करावी अशी मागणी तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे. विशेषतः संजय गांधी निराधार योजना विभागातील पद तातडीने भरून निराधार, वृद्ध व दिव्यांग लाभार्थ्यांची कामे सुरळीत करावीत,अशी अपेक्षाही नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.प्रभारी व्यवस्थेवर महसूल प्रशासनाचा कारभार आणखी किती दिवस चालणार आणि नागरिकांना आपल्या हक्काच्या शासकीय सेवांसाठी किती काळ प्रतीक्षा करावी लागणार, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी आणि महसूल मंत्री तथा पालकमंत्री यांनी या गंभीर प्रश्नाची दखल घेऊन रिक्त पदे भरण्यासाठी तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात येत आहे.
