नांदगाव खंडेश्वर तालुक्यात 2020 पासून नियुक्तीच नाही
अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे योजनेंतर्गत कामावर परिणाम
नांदगाव खंडेश्वर (तालुका प्रतिनिधी)
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) मजुरांना वेळेत काम व मजुरी मिळावी यासाठी शासनाने “मजूर मित्र (मेट)” नेमण्याचे स्पष्ट आदेश दिले असतानाही अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात 2020 पासून एकाही ग्रामपंचायतीत मजूर मेटची नियुक्ती करण्यात आलेली नाही. यामुळे योजनेंतर्गत कामांच्या अंमलबजावणीवर परिणाम होत असून संबंधित अधिकाऱ्यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.या संदर्भात आयुक्त, मनरेगा नागपूर तसेच उपआयुक्त, मनरेगा अमरावती यांनी वेळोवेळी पत्रव्यवहार करून स्पष्ट सूचना दिल्या आहेत. दिनांक 29 मे 2020 व 26 ऑक्टोबर 2020 रोजीच्या पत्रांद्वारे मजूर मेट नियुक्तीबाबत मार्गदर्शक तत्त्वे देण्यात आली होती. मात्र या आदेशांची अंमलबजावणी करण्याबाबत पंचायत समिती व तहसील प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, अशी तक्रार पुढे आली आहे.मजूर मेटची नियुक्ती न झाल्यामुळे मजुरांना वेळेत काम मिळण्यात अडचणी निर्माण होत असून मजुरी वितरण प्रक्रियेतही विलंब होत आहे. परिणामी मनरेगा योजनेचा मूळ उद्देशच बाधित होत असल्याचे चित्र आहे. या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप करत दोषींवर नियमानुसार कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.या संदर्भात मोरेश्वर ज्ञानेश्वराव दिवटे, सदस्य तालुका काँग्रेस कमिटी, नांदगाव खंडेश्वर यांनी मा. आयुक्त, मनरेगा नागपूर यांना निवेदन सादर करून मा. जिल्हाधिकारी अमरावती व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अमरावती यांना तातडीने आदेश देऊन संबंधित पत्रांनुसार कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. तसेच या निवेदनाची प्रत स्थानिक खासदार, आमदार व इतर संबंधित अधिकाऱ्यांना माहिती व पुढील कारवाईसाठी पाठविण्यात आली आहे.
