मनसेचे कृषिमंत्री, पालकमंत्री व जिल्हा प्रशासनाला निवेदन.
१५ दिवसांत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा.
नांदगाव खंडेश्वर | तालुका प्रतिनिधी
अमरावती जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर निकृष्ट व बोगस सोयाबीन बियाण्यांची विक्री झाल्यामुळे हजारो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. उगवण न झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून अनेकांवर जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दोषी बियाणे उत्पादक कंपन्या तसेच त्यांना परवाने देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून बाधित शेतकऱ्यांना संपूर्ण नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.यासंदर्भातील निवेदन महाराष्ट्राचे कृषिमंत्री, अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हा कृषी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) अमरावती तसेच मंगरूळ चव्हाळा पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांना सादर करण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील बहुतांश कृषी केंद्रांमधून विक्री झालेल्या निकृष्ट सोयाबीन बियाण्यांमुळे अमरावती जिल्ह्यातील सुमारे ९० टक्के शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली.

आधीच वाढलेला शेतीचा खर्च, निसर्गाची अनिश्चितता आणि त्यात निकृष्ट बियाण्यांमुळे झालेले नुकसान यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचे मनसेने निवेदनात नमूद केले आहे.मनसेने प्रशासनाकडे निकृष्ट बियाण्यांचे उत्पादन व विक्री करणाऱ्या कंपन्यांवर तसेच अशा कंपन्यांना परवाने देणाऱ्या अधिकाऱ्यांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच तक्रार करणाऱ्या सर्व बाधित शेतकऱ्यांच्या शेतजमिनींचे पंचनामे करून त्याचा अहवाल संबंधित शेतकऱ्यांना देण्यात यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.याशिवाय केवळ बियाण्याची किंमत परत देणे हा न्याय ठरणार नसून, प्रति एकर दहा क्विंटल अपेक्षित उत्पादनाच्या आधारे शेतकऱ्यांना संपूर्ण नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी ठाम भूमिका मनसेने घेतली आहे.प्रशासनाने या मागण्यांवर तातडीने निर्णय घेऊन न्याय द्यावा, अन्यथा पुढील १५ दिवसांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.हे निवेदन मनसेचे तालुका अध्यक्ष निलेश म. मुधोळकर व उपजिल्हाध्यक्ष गजानन काजे यांच्या नेतृत्वाखाली संबंधित अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
