महागडे बियाणे, मशागत व पेरणीचा खर्च वाया; निकृष्ट बियाण्याचा शेतकऱ्यांचा आरोप
तालुका कृषी कार्यालयात ९१ तक्रारी; नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत, दोषी आढळल्यास कारवाईचे कृषी विभागाचे आश्वासन
नांदगाव खंडेश्वर | तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच अनेक शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. कृषी केंद्रातून महागडे सोयाबीन बियाणे खरेदी करून मोठ्या आशेने पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात सोयाबीनची उगवणच झाली नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. बियाणे, मशागत, मजुरी व पेरणीचा लाखो रुपयांचा खर्च वाया गेल्याने आता दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले असून शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
नांदगाव खंडेश्वर परिसर पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. यंदा सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी वेळेत मशागत करून सोयाबीनची पेरणी केली. मात्र अनेक शेतांमध्ये सोयाबीनचे रोपच उगवले नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. काही ठिकाणी उगवण केवळ २५ ते ३० टक्क्यांपर्यंतच मर्यादित राहिल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे.शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कृषी केंद्रातून प्रमाणित म्हणून विकण्यात आलेल्या काही बियाण्यांची उगवणशक्तीच कमी असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील वर्षीही काही शेतकऱ्यांना अशाच प्रकारचा फटका बसला होता. त्यामुळे निकृष्ट दर्जाचे बियाणे विक्री करणाऱ्या संबंधित उत्पादक कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.दरम्यान, कृषी विभागाच्या कार्यपद्धतीवरही शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शासन विविध कल्याणकारी योजना राबवत असले तरी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर कृषी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन वेळेवर पोहोचत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. कृषी सहाय्यकांनी नियमित शेतभेटी घेऊन योग्य मार्गदर्शन केले असते, तर अनेक शेतकऱ्यांचे नुकसान टळले असते, असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, तसेच दोषी बियाणे उत्पादक कंपन्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकरी वर्गाने केली आहे. वेळेत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे कृषी विभाग या गंभीर प्रकरणात किती तत्परतेने कार्यवाही करतो, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
९१ तक्रारी विशेष तपासणी पथक कार्यरत
तालुक्यात सोयाबीन बियाण्याच्या उगवणक्षमतेबाबत आतापर्यंत ९१ तक्रारी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी ४९ तक्रारींची तपासणी पूर्ण झाली असून उर्वरित तक्रारींवर वेगाने कार्यवाही सुरू आहे.
उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपासणी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकात कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ, तालुका कृषी अधिकारी, महाबीजचे प्रतिनिधी तसेच पंचायत समिती व गुणनियंत्रण विभागाचे कृषी अधिकारी सहभागी आहेत. संबंधित बियाण्यांच्या लॉट क्रमांकानुसार अधिकृत नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषी आढळणाऱ्या बियाणे उत्पादक कंपन्यांवर कायदेशीर कारवाई करून बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला मिळवून दिला जाईल,
विकास पाटील, तालुका कृषी अधिकारी,
नांदगाव खंडेश्वर
“मी २७ जून २०२६ रोजी सर्व शिफारशीनुसार सोयाबीनची पेरणी केली. मात्र ७ ते ८ दिवसांनंतर शेताची पाहणी केली असता बियाण्याची उगवण अत्यंत निकृष्ट झाल्याचे दिसून आले. शेतात केवळ ३० टक्केच उगवण झाली आहे. महागडे बियाणे, मशागत, पेरणी व मजुरीचा सर्व खर्च वाया गेला असून आता दुबार पेरणीचे मोठे संकट ओढवले आहे. त्यामुळे माझे आर्थिक बजेट पूर्णपणे कोलमडले आहे.”
— सचिन मधुकरराव इंझळकर, शेतकरी, सालोड
