नेमाडे गुरुजींच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन
चांदूर रेल्वे/ तालुका प्रतिनिधी
धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री प्रतापदादा अडसड यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायत कार्यालय, मालखेड येथे जनकल्याण शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.शिबिराचे उद्घाटन श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थान, श्रीक्षेत्र सावंगा (विठोबा)चे अध्यक्ष मा. श्री पुंजारामजी वै. नेमाडे यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी मालखेड ग्रामपंचायतीच्या प्रशासक श्रीमती लता पाटील यांच्या हस्ते नेमाडे गुरुजी यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.या प्रसंगी गावातील नागरिक, विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिरामध्ये राज्य व केंद्र शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली. तसेच पात्र लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आमदार प्रतापदादा अडसड यांच्या तज्ञ चमूने मार्गदर्शन करून आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया व शासकीय योजनांबाबत सविस्तर माहिती दिली.शासनाच्या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या जनकल्याण शिबिराचे महत्व मा. श्री नेमाडे गुरुजींनी यावेळी व्यक्त केले.
