2025 च्या अतिवृष्टीग्रस्त पिकांचा विमा अद्याप प्रलंबित
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील खंडाळा खुर्द, जावरा मोळवण, रोहना व मुंडवाडा परिसरातील शेतकऱ्यांनी 2025 हंगामातील सोयाबीन, तूर व कापूस पिकांच्या विमा रकमेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सप्टेंबर व ऑक्टोबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शासनाने पंचनामे करून नुकसानाची नोंद घेतली आणि काही प्रमाणात मदत दिली, मात्र पीक विम्याची रक्कम अजूनही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेली नाही.

सोयाबीन पीक काढणीच्या टप्प्यावर असताना अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे आधीच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळण्याची अपेक्षा होती, पण ती अद्याप अपूर्ण राहिली आहे.या पार्श्वभूमीवर 16 एप्रिल 2025 रोजी संबंधित गावांतील शेतकऱ्यांनी नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयात एकत्र येऊन तहसीलदार व तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. या निवेदनामध्ये पीक विम्याची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी करण्यात आली आहे.निवेदन देताना खंडाळा खुर्दचे सरपंच उमेश दहातोंडे, रोहना येथील सरपंच अमरीश काकडे, तसेच नरेश ठाकरे, निलेश ठाकरे, मोहन ठाकरे, नयन ठाकरे, कैलास लांडे, अर्पित काकडे आणि इतर अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली असून मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
