शिक्षक, प्रगणकांची उन्हात फरफट
नांदगाव खंडेश्वर (उत्तम ब्राह्मणवाडे)
सध्या सुरू असलेल्या जनगणना मोहिमेमुळे शिक्षक आणि प्रगणकांवर कामाचा प्रचंड ताण निर्माण झाला असून, कडक उन्हात घराघरांत जाऊन माहिती संकलित करताना त्यांची मोठी फरफट होत आहे. शाळांना सुट्या लागल्यानंतर जनगणना, घरगणना आणि विविध सर्वेक्षणांसाठी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली असली तरी मनुष्यबळाची कमतरता आणि कामाचे असमान वाटप यामुळे अनेकांना गैरसोय भासत आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील विविध भागांत काही प्रगणकांकडे ३०० ते ४०० हून अधिक घरांची जबाबदारी देण्यात आल्याने परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. जनगणनेचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी शिक्षकांना सकाळपासून सायंकाळपर्यंत गावोगावी फिरून माहिती गोळा करावी लागत आहे. प्रत्येक घरात जाऊन नोंदी तपासणे, शंका निरसन करणे आणि ऑनलाइन माहिती भरणे या सर्व प्रक्रियेस मोठा वेळ जात असून शारीरिक त्रास वाढत आहे. तीव्र उन्हामुळे अनेकांना चक्कर येणे, थकवा, डोकेदुखी, अशक्तपणा अशा समस्या जाणवत आहेत.ग्रामीण भागातील मर्यादित वाहतूक सुविधा आणि लांब अंतरांमुळे महिला शिक्षकांची अडचण अधिक वाढली आहे.शिक्षक संघटनांनी प्रशासनाकडे काही तातडीच्या मागण्या मांडल्या आहेत—२०० पेक्षा अधिक घरांसाठी सहायक प्रगणक नेमावेत, जनगणना कामासाठी विशेष रजा द्यावी, कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्ता व विमा संरक्षण उपलब्ध करून द्यावे तसेच उन्हाळ्यात आरोग्य संरक्षणाची विशेष काळजी घ्यावी. संघटनांच्या प्रतिनिधींनी संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन सद्यस्थितीची माहिती दिली असून शिक्षक व प्रगणकांना तातडीने दिलासा देण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.जनगणना हे शासनाचे महत्त्वाचे व लोकशाहीसाठी आवश्यक कार्य असून शिक्षकांनी नेहमीच ते जबाबदारीने पार पाडले आहे. मात्र अपुरे मनुष्यबळ, प्रचंड घरांची जबाबदारी आणि कडक उन्हाचा प्रकोप यामुळे शिक्षक व प्रगणकांची परिस्थिती दिवसेंदिवस कठीण होत चालली असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
