नगरसेवकांच्या पुढाकाराने नागरिकांना दिलासा
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
प्रभाग क्रमांक २ व ३ मधील नागरिकांच्या अतिक्रमण नियमितीकरणासाठी विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले. नगरसेवक अविनाश ब्राह्मणवाडे, नगरसेवक छकुली राहुल गेडाम व नगरसेवक वैभव कोंडवते यांच्या संयुक्त पुढाकाराने हा कॅम्प दिनांक २७ मे २०२६ रोजी घेण्यात आला.
या कॅम्पमध्ये प्रभागातील अनेक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. नागरिकांचे अर्ज स्वीकारणे, कागदपत्रांची पूर्तता करणे व शासकीय प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करणे ही कामे यावेळी करण्यात आली. कॅम्पच्या ठिकाणी नगरसेवकांनी स्वतः उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांचे निराकरण करण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

यावेळी बोलताना नगरसेवक अविनाश ब्राह्मणवाडे म्हणाले, “प्रभागातील नागरिकांची वर्षानुवर्षांची समस्या सोडवण्यासाठी हा कॅम्प महत्त्वाचा आहे. शासनाच्या नियमांनुसार सर्व पात्र अतिक्रमणे नियमित करून नागरिकांना हक्काचे घर मिळवून देणे हा आमचा उद्देश आहे.” नगरसेवक छकुली राहुल गेडाम व वैभव कोंडवते यांनी सांगितले की, “नागरिकांना कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागू नयेत म्हणून आम्ही थेट प्रभागातच ही सुविधा उपलब्ध करून दिली. यापुढेही नागरिकांच्या सोयीसाठी असे उपक्रम राबवले जातील.” या कॅम्पमुळे अनेक गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून नागरिकांनी नगरसेवकांच्या या उपक्रमाचे स्वागत केले आहे.
