पर्यावरण संवर्धनासाठी प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात
युवा ग्रामीण पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष उत्तम ब्राम्हणवाडे यांची मागणी
नांदगाव खंडेश्वर/ तालुका प्रतिनिधी
राज्यासह विदर्भात दिवसेंदिवस तापमानात मोठी वाढ होत असून त्याचा परिणाम सर्वसामान्य जनजीवनावर होत आहे.वाढते तापमान,पाण्याची टंचाई,प्रदूषण आणि बदलते हवामान या समस्यांवर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड मोहिम राबविण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेतला पाहिजे,असे मत विविध स्तरातून व्यक्त होत आहे.याबाबत युवा ग्रामीण पत्रकार संघाचे अमरावती विभागीय अध्यक्ष उत्तम ब्राम्हणवाडे आणि नगरसेवक वासुदेव लोखंडे यांनी नांदगाव खंडेश्वर येथील नगर पंचायतचे मुख्याधिकारी यांच्याकडे व्यापक वृक्ष लागवड अभियान राबविण्याची मागणी केली आहे.शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर वृक्षांची संख्या कमी होत चालली असून काँक्रीटीकरणामुळे उष्णतेचे प्रमाण वाढत असल्याचे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे प्रत्येक गाव,शहर,शाळा, महाविद्यालय,सार्वजनिक संस्था आणि शासकीय कार्यालय परिसरात वृक्ष लागवड करणे काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.शहरातील अमरावती यवतमाळ रोड, चांदूर रेल्वे रोड,पहूर रोडच्या दोन्ही बाजूने निंबाची वडाची पिंपळाची झाडे लावणे आणि ती जगविण्यासाठी त्यांना दररोज पाणी देणे तसेच शहरातील सर्व लेआऊट मधील ओपन स्पेस मध्ये आणि जिथे मोकळी जागा असेल तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करावी अशी मागणी त्यांनी केली आहे दरवर्षी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वृक्ष लागवड मोहिमा राबवल्या जातात, मात्र अनेक ठिकाणी त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. लावलेल्या झाडांचे संगोपन आणि संवर्धन याकडे दुर्लक्ष होत नसल्याने अपेक्षित परिणाम दिसून येत नाहीत.त्यामुळे केवळ झाडे लावणे नव्हे तर त्यांचे संगोपन, नियमित पाणीपुरवठा आणि संरक्षण यावरही विशेष भर देणे आवश्यक आहे.तसेच प्रशासनाने विविध विभागांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करावी, पर्यावरणपूरक उपक्रमांना प्रोत्साहन द्यावे आणि युवक, सामाजिक संस्था तसेच स्वयंसेवी संघटनांना सहभागी करून मोठ्या प्रमाणावर लोकचळवळ उभी करावी,अशी मागणीही उत्तम ब्राम्हणवाडे यांनी केली आहे.वाढत्या तापमानाचा फटका शेती, आरोग्य आणि पाणी व्यवस्थेवरही होत असल्याने पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने जबाबदारी स्वीकारणे गरजेचे आहे. वृक्ष लागवड ही केवळ मोहीम न राहता ती लोकचळवळ बनली तरच भविष्यातील पर्यावरणीयसंकटांवर प्रभावी नियंत्रण मिळवता येईल, असा विश्वास सुद्धा उत्तम ब्राम्हणवाडे आणि नगरसेवक वासुदेव लोखंडे यांनी व्यक्त केला आहे।
