मजुरांच्या घामाचा पैसा गायब; मनरेगा निधी गडप केल्याचा गंभीर आरोप..
नांदगाव खंडेश्वर /उत्तम ब्राम्हणवाडे
ग्रामीण भागातील विविध गावांमध्ये मनरेगा योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या ग्रामरोजगार सेवकांच्या कामकाजावर नागरिकांकडून आक्षेप नोंदवले जात आहे.या विषयावर स्थानिक पातळीवर मोठी चर्चा रंगली आहे.ग्रामरोजगार सेवक हे कंत्राटी पद्धतीने निवडले जाणारे पद असल्याने नियमित शासकीय वर्गवारीत त्यांचा समावेश नसतो. त्यामुळे “दुय्यम दर्जाचे पद”, जबाबदारीची मर्यादा आणि शासकीय निर्णयक्षमतेतील कमतरता या मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
ग्रामीण भागातील अनेक ठिकाणांहून मनरेगा कामांसंदर्भात
• हजेरी नोंदीतील त्रुटी,
• लाभार्थ्यांना योग्य मार्गदर्शनाचा अभाव,
• कामकाजातील पारदर्शकतेची कमी,
• शासकीय प्रक्रिया विलंबित करण्याचे आरोप
अशी तक्रारी पुढे आल्या आहेत.
नागरिकांनी पंचायत व मनरेगा विभागाकडे ग्रामरोजगार सेवकांच्या कामकाजाची चौकशी करावी, जबाबदाऱ्या अधिक स्पष्ट कराव्यात आणि मनरेगा कामांमध्ये पारदर्शकता वाढवावी अशी मागणी केली आहे.पंचायत प्रशासनाकडून या तक्रारींची प्राथमिक माहिती घेतली असून आवश्यक ती चौकशी सुरू करण्याची तयारी दाखविल्याचे समजते.मनरेगा मजुरीत भ्रष्टाचार? ग्रामरोजगार सेवकांवर गंभीर आरोप ग्रामीण भागात मनरेगा मजुरीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. घरकुल योजना व मनरेगा मजुरीचा निधी ग्रामरोजगार सेवकांकडून गडप केला जात असल्याची तक्रार समोर आली आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार
• मजुरीची रक्कम तीन वेगवेगळ्या खात्यांत फिरवली जाते,
• पण अंतिम रक्कम मजुरांपर्यंत पोहोचतच नाही,
• काही मध्यस्थ अधिकारी स्वतःचा फायदा करून घेतात,
असा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
मजुरांचे म्हणणे “काम आम्ही करतो, पण मजुरी वेळेवर मिळत नाही. खाते बंद, रक्कम परत ही कारणे देऊन पैसे गायब होतात. खरा हिशोब द्यायला कुणीही तयार नाही.”नागरिकांनी तात्काळ चौकशी व दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे. मनरेगा सारखी गरीबांच्या हाताला रोजगार देणारी योजना भ्रष्टाचाराच्या कचाट्यात अडकल्याने ग्रामीण भागात संताप उसळला आहे.प्रशासनाकडून तक्रारींची नोंद घेण्यात आली असून निधी व्यवहार व मजूर नोंदींची तपासणी सुरू होणार असल्याचे समजते.
