बुद्ध विहाराला सदिच्छा भेट; अधिक मास निमित्त सुरू असलेल्या भागवत सप्ताहात सहभाग
अंजनगाव बारी (पवन इंगोले)
अंजनगाव बारी येथे पत्रकार साहेबराव राऊत यांच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या घरी जाऊन सांत्वन व्यक्त केल्यानंतर बळवंत वानखडे यांनी पार्डी(देवी) गावाकडे दौरा केला. सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक घडामोडींमध्ये सातत्याने सहभागी राहण्याच्या त्यांच्या भूमिकेची प्रतीती या दौऱ्यातून पुन्हा स्पष्ट झाली.पार्डी(देवी) येथे आगमनानंतर खासदारांनी प्रथम येथील बुद्ध विहाराला भेट देऊन शांतता, बंधुता आणि समभावाचा संदेश देणाऱ्या तथागत बुद्धांना वंदन केले. स्थानिक बौद्ध समाजाच्या प्रतिनिधींशी संवाद साधत त्यांनी सामाजिक सलोखा आणि विकास विषयक चर्चा केली.त्यानंतर अधिक मास निमित्त पार्डी(देवी) येथे सुरू असलेल्या भागवत सप्ताह कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती लावली.कीर्तनकारांकडून सुरू असलेला धर्मोपदेश त्यांनी मनोभावे ऐकला आणि धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांशी भेट घेतली.

यावेळी खासदारांनी सांगितले “अधिक मास म्हणजे आत्मचिंतन व अध्यात्मिक बळ वाढवण्याचा काळ. समाजात नैतिकता, शांतता आणि सद्भाव टिकून राहावा, हाच या भेटीचा उद्देश आहे.”या संपूर्ण दौऱ्यात स्थानिक नागरिक, कार्यकर्ते आणि विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्थानिकांनी खासदारांच्या या संवेदनशील व लोकसंग्रही भेटीचे स्वागत केले.
