अंजनगाव बारी /पवन इंगोले
राज्यात सुरू असलेल्या जनगणना मोहिमेमुळे अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शिक्षक व प्रगणकांवर कामाचा ताण प्रचंड वाढला आहे. तळपत्या उन्हात घराघरांत जाऊन माहिती संकलित करताना शिक्षकांची अक्षरशः फरफट होत असून अनेक शिक्षक या परिस्थितीबद्दल तीव्र संताप व्यक्त करत आहेत.शाळांना सुट्या लागल्यानंतर शिक्षकांना जनगणना, घरगणना व विविध सर्वेक्षणांच्या अतिरिक्त कामांसाठी नियुक्त करण्यात आले आहे. मात्र अपुरा कर्मचारीवर्ग, कोणतीही योग्य योजना नसणे आणि एका प्रगणकावर शेकडो घरांची जबाबदारी देण्यात आल्यामुळे शिक्षक त्रस्त झाले आहेत. “” अशी नाराजी अनेक शिक्षकांनी व्यक्त केली.कडक उन्हामुळे चक्कर येणे, अशक्तपणा, डोकेदुखी, निर्जलीकरण यांसारख्या आरोग्य समस्या मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था खराब असल्याने व वाहतुकीची व्यवस्था नसल्यामुळे विशेषतः महिला प्रगणकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.माहिती संकलन, पडताळणी आणि ऑनलाइन नोंदी भरण्यासाठी शिक्षकांना दिवसभर गावोगावी फिरावे लागत आहे. सुट्यांमध्ये विश्रांती मिळण्याऐवजी उलट दुप्पट कामाचा ताण येत असल्याची खंत शिक्षक व्यक्त करत आहेत.अमरावती जिल्ह्यातील शिक्षक संघटनांनी प्रशासनाकडे अतिरिक्त प्रगणकांची नेमणूक, वाहतूक भत्ता, विशेष रजा, आरोग्य व अपघात विमा संरक्षण आणि समान कामाचे वाटप यांसारख्या मागण्या तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे. “परिस्थिती सुधारली नाही तर मोठ्या प्रमाणात आंदोलनाचा विचार करू,” असा इशारा शिक्षक संघटनांनी दिला आहे.
