“सुरक्षित प्रवास, सुरक्षित परिवार” — अमरावती ग्रामीण पोलिसांचे आवाहन
अंजनगाव बारी/ पवन इंगोले
रस्ते अपघातांमध्ये होणाऱ्या मृत्यू व गंभीर दुखापती रोखण्यासाठी अमरावती ग्रामीण पोलिसांनी दुचाकी चालक आणि मागे बसणाऱ्या प्रवाशांसाठी (पिलियन रायडर) हेल्मेट वापरणे सक्तीचे करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांनी जाहीरनामा प्रसिद्ध करून नागरिकांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.अमरावती ग्रामीण जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत अपघातांचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढले असून, प्राणघातक अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणावर दुचाकीस्वारांचा समावेश असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेषतः हेल्मेट न वापरल्यामुळे डोक्याला गंभीर दुखापत होऊन अनेकांना जीव गमवावा लागत असल्याची बाब पोलिस प्रशासनाने अधोरेखित केली आहे. मोटार वाहन कायदा १९८८ व सुधारित तरतुदींनुसार दुचाकी चालक तसेच मागे बसणाऱ्या व्यक्तीस आयएसआय (ISI) मानांकन असलेले हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे. याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी २२ जून २०२६ पासून अमरावती ग्रामीण पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.या मोहिमेदरम्यान हेल्मेटशिवाय वाहन चालविताना अथवा प्रवास करताना आढळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून, आवश्यकतेनुसार वाहनचालकाचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) तीन महिन्यांसाठी निलंबित करण्याची कारवाईही केली जाऊ शकते.अमरावती ग्रामीण पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, हेल्मेट हे केवळ दंडापासून बचावाचे साधन नसून स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेचे कवच आहे. त्यामुळे प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेटचा नियमित वापर करून जबाबदार नागरिकत्वाचे कर्तव्य पार पाडावे.
*महत्त्वाचे :-*
👉 २२ जून २०२६ पासून विशेष अंमलबजावणी मोहीम
👉 चालकासह पिलियन रायडरलाही हेल्मेट सक्ती
👉 आयएसआय मानांकन असलेले हेल्मेट वापरणे आवश्यक
👉 नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई व परवाना निलंबनाची शक्यता
“हेल्मेट वापरा… जीवन वाचवा!” 🚦🏍️🪖
