आयटीआय शिक्षणामुळे तरुणांना रोजगाराची सुवर्णसंधी.
एक-दोन वर्षांच्या प्रशिक्षणानंतर तत्काळ नोकरीची संधी.
समाजसेविका सौ.पल्लवी यादगिरे यांचे आवाहन.
नांदगाव खंडेश्वर/ तालुका प्रतिनिधी
सध्याच्या स्पर्धात्मक युगात रोजगार मिळविण्यासाठी तांत्रिक शिक्षणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. येणाऱ्या काळात तांत्रिक कौशल्य असलेल्या व्यक्तींनाच रोजगार क्षेत्रात अधिक संधी उपलब्ध होणार असल्याने ग्रामीण भागातील तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील मुला-मुलींनी आयटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्था) मध्ये प्रवेश घ्यावा,असे आवाहन समाजसेविका पल्लवी यादगिरे यांनी केले आहे.यावेळी त्या म्हणाल्या की,आज अनेक उद्योग,कारखाने आणि विविध क्षेत्रांमध्ये प्रशिक्षित तांत्रिक मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणात गरज आहे. आयटीआयमधील विविध ट्रेडचे प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना रोजगार मेळाव्यांद्वारे थेट नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत. अनेक कंपन्या आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना १८ हजार रुपयांपेक्षा अधिक वेतनावर नोकरी देत आहेत.

आयटीआयचे एक किंवा दोन वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना तत्काळ रोजगार मिळण्याची शक्यता वाढते. त्यामुळे केवळ पदवी शिक्षणावर अवलंबून न राहता तांत्रिक शिक्षण घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.ग्रामीण भागात अनेक विद्यार्थी व पालकांना आयटीआयच्या संधींबाबत पुरेशी माहिती नसल्याने अनेक युवक रोजगाराच्या संधींपासून वंचित राहतात. त्यामुळे आपल्या परिसरातील खेड्यांमध्ये राहणाऱ्या आर्थिक परिस्थितीने दुर्बल असलेल्या मुला-मुलींना आयटीआयमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रोत्साहित करावे आणि ही माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी असे आवाहन सौ. पल्लवी यादगिरे यांनी केले आहे.तांत्रिक शिक्षण हे आजच्या काळाची गरज असून रोजगारक्षम भारत घडविण्यासाठी आयटीआय शिक्षण महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
