भव्य महाप्रसाद,सेवाधारी भजनकार यांचा सत्कार व मांड वाढवा कार्यक्रम
चांदुर रेल्वे (तालुका प्रतिनिधी)
अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुक्यातील पवित्र श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) येथे अधिक ज्येष्ठ मास अमावस्या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थानच्या वतीने दि. १५ जून २०२६, सोमवार रोजी सायंकाळी ५. ०० वाजता संस्थान परिसरात भक्तिमय वातावरणात चंदन उटी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानंतर बाहेरगावाहून आलेल्या भाविक भक्तांसह समस्त ग्रामस्थांसाठी संस्थानच्या अन्नदान समितीच्या नियोजनात भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.तसेच, दि. १६ मे २०२६ ते १५ जून २०२६ या कालावधीत अधिक मासानिमित्त सुरू असलेल्या अखंड जागृती भजन मांड कार्यक्रमाचा वाढवा दि. १६ जून २०२६, मंगळवार रोजी सकाळी ९ वाजता महाराजांच्या अरज व आरतीने विश्वस्त मंडळ व भाविक भक्तांच्या उपस्थितीत भजनाच्या गजरात संपन्न होणार आहे.या मांडी मध्ये दैनंदिन दिवस पाळीत निस्वार्थ भावनेने सेवा दिली अशा सेवाधारी भजनकार भाविकांचा संस्थानचे वतीने सन्मानपत्र देवून सत्कार करण्यात येत आहे.या धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचा लाभ घेण्यासाठी भाविक-भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून तन-मन-धनाने सहकार्य करावे, असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष पुंजाराम नेमाडे, उपाध्यक्ष कृपासागर राऊत, सचिव अशोक सोनवाल तसेच विश्वस्त विनायक पाटील, वसंत शेंडे, गोविंद राठोड, फुलसिंग राठोड, चरणदास कांडलकर, प्रविण कुकडकर, लक्ष्मण राठोड, वैभव मानकर, स्वप्निल चौधरी आणि संस्थान कर्मचारी यांनी केले आहे.
