ध्वज स्तंभा सभोवतालचा परिसर सुशोभीकरण करण्याची मागणी
मोरेश्वर दिवटे यांनी गटविकास अधिकारी यांना दिले निवेदन
नांदगाव खंडेश्वर / उत्तम ब्राम्हणवाडे
नांदगाव खंडेश्वर येथील पंचायत समितीच्या आवारात मुख्य प्रवेशद्वाराच्या अगदी बाजूला स्वातंत्र्य लढ्यात हुतात्मा झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या नावाने एक छोटे स्मारक उभारण्यात आले आहे.आणि त्यालगत ध्वज स्तंभ सुद्धा उभारण्यात आला आहे. त्या स्मारकाच्या आणि ध्वज स्तंभाच्या आजूबाजूचा परिसर सुशोभित करण्यासाठी यापूर्वी फुलझाडे लावून सुंदर परसबाग तयार करण्यात आली होती. मात्र, सध्या देखभालीअभावी ही झाडे पूर्णतः सुकून गेली असून परिसराचीही दुरवस्था झाल्याचे दिसून येत आहे.
या ठिकाणाचे पुन्हा नूतनीकरण करून नवीन फुलझाडे लावावीत, तसेच पंचायत समितीच्या आवारात उपलब्ध असलेल्या मोकळ्या जागेची स्वच्छता करून त्या ठिकाणी आकर्षक बगीचा विकसित करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मोरेश्वर दिवटे यांनी गटविकास अधिकारी डॉ स्नेहल शेलार यांना निवेदनाद्वारे केली आहे. गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पंचायत समितीच्या मुख्य प्रवेश द्वारासमोर ध्वज स्तंभाच्या लगत हुतात्मा स्मारक असलेल्या ठिकाणी स्वच्छ, सुंदर आणि हिरवाईने नटलेला परिसर निर्माण केल्यास नागरिकांमध्ये स्वातंत्र्य सैनिकांच्या विषयी अधिक सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत होईल, पुर्वी हा बगीचा तयार करण्यात आला होता.परंतु तो बगीचा देख रेखी अभावी सुकलेला असल्याने तो आता विद्रूप दिसत आहे.त्यामुळे तो पुनर्जीवित करून या परिसरात नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची आणि बगीच्यातील झाडांना पाणी देण्यासाठी स्वतंत्र पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. आणि पंचायत समितीच्या आवारातील जुना झेंडा खांब व त्याच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करून आवश्यक ठिकाणी रंगरंगोटी करावी, अशी मागणीही मोरेश्वर दिवटे यांनीकेली आहे.

पंचायत समिती हे तालुक्यातील महत्त्वाचे प्रशासकीय केंद्र असून येथे विविध कामांसाठी दररोज मोठ्या संख्येने नागरिक येतात. त्यामुळे परिसर स्वच्छ, सुशोभित आणि नागरिकांसाठी सुविधायुक्त असणे गरजेचे आहे. प्रशासनाने केवळ कामापुरता मर्यादित न राहता या परिसराचीही योग्य देखभाल करावी आणि उपलब्ध जागेचा उपयोग करून सुंदर बगीचा विकसित करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.या मागणीची पंचायत समिती प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर पाहणी करावी आणि आवश्यक निधी व नियोजन करून परिसराचे नूतनीकरण करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मोरेश्वर ज्ञानेश्वर दिवटे यांनी गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
