प्रवाशी महिलांची होत आहे हेळसांड
नांदगाव खंडेश्वर/उत्तम ब्राम्हणवाडे
केंद्र शासनाने महिलांना सक्षम बनवण्यासाठी व त्यांचा हक्क त्यांना मिळाला पाहिजे यासाठी लोकसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षणाचा निर्णय झाला असला तरी, एसटी महामंडळाच्या बसमध्ये महिलांसाठी राखीव खुर्चीवर पुरुषांच्या अतिक्रमणामुळे त्यांच्या हक्काची जागा असून सुद्धा त्यांना मिळत नसल्याने आम्ही बसावे कुठे ? असा सवाल महिला प्रवाशांनी उपस्थित केला आहे.
राज्य मार्ग परिवहन महामंडळ एसटीमध्ये लालपरी, हिरकणी, शिवशाही, शिवाई, विठाई अशा सर्व बसमध्ये महिलांसाठी त्यांच्या हक्काच्या चार जागा राखीव असतात. महिला सन्मान योजनेमध्ये प्रवासात महिलांना ५० टक्के तिकीट सवलत दिली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून महिला प्रवाशांची संख्या वाढली आहे. मात्र बहुतांश बसमध्ये उभे राहून महिलांना प्रवास करावा लागत आहे. एकीकडे संसदेत नारी शक्ती वंदना विधेयक २०२३ मंजुर करुन केंद्र सरकारने महिला सशक्तीकरणाचा पुरस्कार केला तर दुसरीकडे महिलांसाठी असलेल्या सुविधांची अंमलबजावणी होत नसल्याने महिलांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

राखीव जागांचे काय आहे दादा, हल्ली बसमध्ये बहुतांश महिलांना जागाच मिळत नाही. महिला प्रवासी वाढल्या, त्यावर आता पुरुषही महिलांच्या राखीव जागा न पाहता बसतात. त्यांना कोण आवरणार ? महिलांनी काही म्हणले की वाद घालत आहेत. त्यामुळे महिला उभे राहून प्रवास करतात.
सौ.शोभा वासुदेव लोखंडे
प्रवासी,नांदगाव खंडेश्वर
महिलां आणि विद्यार्थिनी करीता बसमध्ये राखीव जागा केवळ नावालाच आहे. बरेचदा पुरुषच बसलेले दिसतात. आम्ही कॉलेजकरीता दररोज अपडाऊन करतो पण आम्हाला कधीच बसायला जागा मिळत नाही सीटवरपुरुषच बसलेले दिसतात त्यांना उठवावे कसे? असा प्रश्न पडतो. वाहकांनी किमान लक्ष द्यायला हवे.
– कु. हर्षा विनोद अडलोक,विद्यार्थिनी
प्रवासी महिलांसाठी एसटी महामंडळाने जास्तीत जास्त जागा बसमध्ये ठेवायला हव्यात. बहुतांशवेळा वृध्द व्यक्ती बसत असल्याने त्यांना उठविण्याची इच्छा होत नाही. महामंडळाने किमान याचे नियोजन करायला हवे.
– सौ.रेखा गजानन नागोलकर
सामाजिक कार्यकर्त्यां, नांदगाव खंडेश्वर
