अखंड भजनाने अवधूतनगरी दुमदूमणार; भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था
विशेष : दसरा यात्रा महोत्सव,सार्वजनिक कोजागरी पौर्णिमा कार्यक्रम
चांदूर रेल्वे (तालुका प्रतिनिधी)
अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील प्रसिद्ध अवधूतनगरी श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) येथील श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थान येथे शनिवार, १० ऑक्टोबर २०२६ रोजी कार्तिक मास मांड (अखंड भजन) शुभारंभ तसेच अमावस्या निमित्त चंदनउटी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवारी पहाटे ५ वाजता लहान मंदिरात ढाल बसवून कार्तिक मास मांडीस प्रारंभ मुख्य मंदिरात महाराजांच्या अरजानी करून विश्वस्त मंडळ व भाविकांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पार पडणार आहेत. दुपारी ४ वाजता अमावस्या निमित्त चंदनउटी उत्सव होणार असून, सायंकाळी ६ वाजता बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसाद अन्नदानाचे आयोजन करण्यात आले आहे.कार्तिक मास निमित्त अखंड भजन मांडीचा कालावधी शनिवार दिनांक १० ऑक्टोबर २०२६ ते बुधवार दिनांक २५ नोव्हेंबर २०२६ हा राहिल.या मांडीदरम्यान बाहेरगावाहून येणाऱ्या विविध अवधूत भजन मंडळांचा दैनंदिन सहभाग राहणार आहे. संस्थानच्या वतीने संपूर्ण कार्तिक मासासाठी दिवस-रात्र भजन पाळीचे नियोजन करण्यात आले आहे. सहभागी भजन मंडळांसाठी चहा, नाश्ता व भोजनाची व्यवस्था करण्यात आली असून, नव्याने सामील होणाऱ्या भजन मंडळांचा सन्मानपत्र, संस्थानची टोपी व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येणार आहे. तसेच अवधूत भजन मंडळांना महाराजांची गाथा भेट स्वरूपात देण्यात येणार आहे.संस्थानचे वतीने मंगळवार दिनांक २० ऑक्टोबर २०२६ रोजी दसरा यात्रा महोत्सव साजरा करण्यात येत आहे,या निमित्त संस्थान मध्ये दुपारी १२ वाजता चंदन उटी उत्सव आणि दुपारी ४ वाजता झेंडे चढविण्याचा चित्त थरारक नेत्रदीप सोहळा संस्थानचे विश्वस्त चरणदास कांडलकर (सावंगा विठोबा) यांचे शुभ हस्ते विश्वस्त मंडळ आणि हजारो संख्येने भाविकांचे उपस्थितीत संपन्न होणार आहे.या यात्रेकरिता अमरावती आणि चांदुर रेल्वे बसस्थानक मधून यात्रा बसेसची व्यवस्था करण्यात येणार आहे.शांतता व सुव्यवस्था राखण्याचे दृष्टीने या यात्रेत पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.झेंडे चढविण्याच्या कार्यक्रमानंतर संस्थानचे वतीने भाविकांकरिता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.रविवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रात्री संस्थानचे वतीने सार्वजनिक कोजागरी पौर्णिमा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे,ज्या भाविकांना या कार्यक्रमात सहभागी व्हायचे आहे,त्यांनी आपली स्व-ईच्छेने देणगी देवून सहभागी व्हावे,असे आवाहन संस्थानचे वतीने करण्यात आले आहे.बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांसाठी अन्नदान समितीच्यावतीने दैनंदिन महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच प्रसादालयामध्ये प्रसाद देणगीची पावती घेऊन भाविकांना प्रसादाचा लाभ घेता येणार आहे.
गौरक्षणासाठी चाऱ्याचे आवाहन
संस्थानच्या गौरक्षणमध्ये भाविकांनी दान दिलेल्या गायींची देखभाल केली जात असून, सध्या गायींसाठी चाऱ्याची नितांत आवश्यकता आहे. इच्छूक दात्यांनी गौरक्षणासाठी चारा उपलब्ध करून देऊन सहकार्य करावे, असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.या धार्मिक सोहळ्याचा सर्व भाविक-भक्तांनी लाभ घ्यावा आणि तन-मन-धनाने सहकार्य करावे, असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष पुंजाराम नेमाडे, उपाध्यक्ष कृपासागर राऊत, सचिव अशोक सोनवाल तसेच विश्वस्त वसंत शेंडे, गोविंद राठोड, फुलसिंग राठोड, चरणदास कांडलकर, प्रविण कुकडकर, लक्ष्मण राठोड, विष्णू राठोड, वैभव मानकर, स्वप्नील चौधरी आदींनी केले आहे.
