जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक विषयांवर चर्चा;
आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या प्रश्नांचा आढावा
नांदगाव खंडेश्वर / तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेले दुष्काळग्रस्त पाणी दोरा संपवून विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी शिवसेना तालुकाप्रमुख पवन ठाकरे यांच्या नांदगाव खंडेश्वर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची संघटनात्मक बांधणी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भूमिका तसेच तालुक्यातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
दौऱ्यादरम्यान अहिर यांनी तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतीची पाहणी केली तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या प्रश्नांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या कागदपत्रांशी संबंधित कामात अनावश्यक विलंब होऊ नये, अशा सूचना अहिर यांनी दिल्या. संबंधित शासकीय प्रक्रियेत दिरंगाई आढळल्यास त्याची दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भेटी देऊन त्यांच्या अडचणी व प्रलंबित प्रश्न जाणून घ्यावेत. संबंधित प्रश्न प्रशासन व शासन स्तरावर मांडून त्यांचा पाठपुरावा करावा, असे निर्देशही अहिर यांनी दिले.दरम्यान, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील संघटनात्मक स्थितीचा आढावा घेण्यात आला. गावपातळीवरील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संपर्क, पक्षाच्या संघटनात्मक कामकाजाची दिशा तसेच स्थानिक प्रश्नांबाबतही यावेळी चर्चा झाली.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख आशिष धर्माळे, सुनील केने, राजेंद्र लेंडे, प्रशांत वैद्य, सुधीर खंडार, दिलीप डोईफोडे, नंदकिशोर इंगळे, विवेक भगत, नितीन रावेकर, राजेश ठाकरे, धनंजय भाडके, एकांत शिरभाते यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
