संबंधित अधिकाऱ्यांवर दोष सिद्ध झाल्यास कठोर कारवाई करावी – राष्ट्रीय चर्मकार महासंघाची मागणी
लोकप्रतिनिधींचा अपमान व खोट्या गुन्ह्यात अडकविण्याच्या कथित प्रकाराचा तीव्र निषेध; पोलीस आयुक्त व मनपा प्रशासनाला निवेदन
अमरावती/जिल्हा प्रतिनिधी
अमरावती महानगरपालिकेच्या गोपालनगर प्रभागाचे नगरसेवक तथा चर्मकार समाजाचे लोकप्रतिनिधी संजय रामकृष्ण गव्हाळे यांच्याशी महानगरपालिका झोन क्रमांक ३ येथील सहाय्यक आयुक्तांनी केलेल्या कथित गैरवर्तनाचा तसेच त्यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या मारहाणीच्या गुन्ह्याचा निषेध करीत, संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रीय चर्मकार महासंघ, अमरावती जिल्ह्याच्या वतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भात पोलीस आयुक्त कार्यालय आणि महानगरपालिका प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले.निवेदनानुसार, दि. २० नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास नगरसेवक संजय गव्हाळे हे आपल्या प्रभागातील नागरिकांच्या समस्या व विकासकामांसंदर्भात महानगरपालिका झोन क्रमांक ३, दस्तूरनगर कार्यालयात गेले होते. यावेळी सहाय्यक आयुक्त नितीन बोबडे यांनी त्यांच्याशी उद्धटपणे वर्तन करून सर्वांसमक्ष अपमानास्पद व शिवराळ भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच आपण लोकप्रतिनिधी असल्याचे सांगितल्यानंतरही त्यांचा अपमान करण्यात आला आणि खोट्या प्रकरणात अडकविण्याची धमकी देण्यात आल्याचे निवेदनात नमूद आहे.

या घटनेच्या वेळी झोन सभापती इस्माईल लालुवाले व नगरसेवक सचिन वैद्य हे उपस्थित होते. या प्रकरणी संजय गव्हाळे यांनी फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन येथे ऑनलाइन तक्रारही दाखल केली आहे.दरम्यान, संबंधित घटनेचे सीसीटीव्ही फुटेज प्रसारमाध्यमांवर प्रसारित झाले असून, त्यामध्ये नगरसेवक संजय गव्हाळे हे सहाय्यक आयुक्तांना मारहाण करत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत नसल्याचा दावा महासंघाने केला आहे. असे असतानाही त्यांच्याविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने या संपूर्ण प्रकरणाची सत्यता निष्पक्षपणे तपासण्याची आवश्यकता असल्याचे महासंघाने म्हटले आहे.लोकशाही व्यवस्थेमध्ये लोकप्रतिनिधींना जनतेचे प्रश्न प्रशासनासमोर मांडण्याचा संविधानिक अधिकार आहे. नागरिकांच्या समस्या मांडण्यासाठी शासकीय कार्यालयात गेलेल्या लोकप्रतिनिधीला अपमानास्पद वागणूक देणे, शिवीगाळ करणे आणि खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देणे, असे प्रकार लोकशाही व्यवस्थेला शोभणारे नाहीत. विशेषतः चर्मकार समाजाच्या लोकप्रतिनिधीसोबत घडलेल्या या कथित प्रकारामुळे समाजबांधवांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.महासंघाने निवेदनातून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमार्फत या प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करावी, घटनेवेळी उपस्थित असलेल्या झोन सभापती व नगरसेवकांचे जबाब नोंदवावेत, झोन क्रमांक ३ कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तातडीने तपासून सुरक्षित ठेवावे, सहाय्यक आयुक्त नितीन बोबडे यांच्यावरील आरोपांची चौकशी करून दोष सिद्ध झाल्यास कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करावी, तसेच नगरसेवक संजय गव्हाळे यांच्या तक्रारीवर कायद्यानुसार तातडीने कार्यवाही करावी, अशा प्रमुख मागण्या केल्या आहेत.राष्ट्रीय चर्मकार महासंघ सामाजिक न्याय, समता, स्वाभिमान आणि समाजाच्या हक्कांसाठी सातत्याने कार्य करीत आहे. कोणत्याही व्यक्तीवर अन्याय होऊ नये आणि लोकप्रतिनिधींना सन्मानाची वागणूक मिळावी, हीच महासंघाची भूमिका आहे. या प्रकरणात कोणाच्याही दबावाला बळी न पडता सत्य समोर आणून संबंधितांना न्याय मिळवून द्यावा, अशी आग्रही मागणी महासंघाने केली आहे.यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष निलेश जामठे, राज्य कार्यकारिणी सदस्य शामकुमार आकोडे, सचिव व संपर्कप्रमुख पुरुषोत्तम वनस्कर, साहित्यिक भास्करराव भटकर, सचिव पांडुरंग गोंडेकर, सेवानिवृत्त पीएसआय गजानन खंडारे, गठाई कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष दिलीप वरजे, संजय खंदारे, कृष्णा मोहकर, पांडुरंग खंडारे, बाळकृष्ण गव्हाळे, जिल्हा उपाध्यक्ष जगदीश रेवसकर, प्रल्हाद खंडारे, अवधुत खरुले, दिलीप वाजगे, संदीप चोखट आदी पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते.
