५ डिसेंबरच्या राज्यस्तरीय विश्वस्त परिषदेसाठी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण;
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचीही भेट घेऊन मंदिरांच्या प्रश्नांवर चर्चा
अमरावती/जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र देवस्थान समितीच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथील मंत्रालयात भेट घेऊन राज्यातील मंदिरांच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी अमरावती येथे ५ डिसेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय विश्वस्त परिषदेस उपस्थित राहण्याचे निमंत्रण मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.
महाराष्ट्र देवस्थान समिती व धर्मदाय आयुक्त कार्यालय, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दिनांक ५ डिसेंबर २०२६ रोजी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, मूर्ती रोड, अमरावती येथे राज्यस्तरीय विश्वस्त परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. विदर्भात प्रथमच अशा स्वरूपाची राज्यव्यापी विश्वस्त परिषद आयोजित करण्यात येत असून, या परिषदेला संपूर्ण महाराष्ट्रातून मंदिरांचे विश्वस्त व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.या परिषदेला मुंबईचे धर्मदाय आयुक्त श्री. अमोघजी कलोती, अमरावतीचे सहधर्मदाय आयुक्त श्री. दीपक खोचे, धर्मदाय आयुक्त कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी, रायगड येथील श्री. राजेश इंगोले तसेच राज्याचे महसूलमंत्री श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
मंदिरांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांसमोर चर्चा
राज्यातील मंदिरांचे संरक्षण व संवर्धन, देवस्थानांच्या जमिनींचे प्रश्न, मंदिर विश्वस्तांना भेडसावणाऱ्या विविध प्रशासकीय व कायदेशीर अडचणी तसेच देवस्थानांच्या विकासाशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.मंदिरांचे व्यवस्थापन अधिक सक्षम व पारदर्शक व्हावे, मंदिरांच्या समस्या शासनस्तरावर मार्गी लागाव्यात आणि विश्वस्तांना आवश्यक ते सहकार्य मिळावे, या उद्देशाने महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने विविध मागण्या व प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्यात आले.यावेळी अमरावती जिल्ह्यातील आमदार श्री. प्रतापदादा अडसूळ, अचलपूरचे आमदार श्री. प्रवीणदादा तायडे तसेच महाराष्ट्र देवस्थान समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
महसूलमंत्र्यांचीही भेट
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर शिष्टमंडळाने राज्याचे महसूलमंत्री श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांचीही भेट घेतली. या भेटीदरम्यान मंदिरांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. देवस्थानांच्या जमिनी, मंदिरांच्या संरक्षण-संवर्धनाशी संबंधित विषय आणि विश्वस्तांना येणाऱ्या अडचणी याबाबत शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा शिष्टमंडळाने व्यक्त केली.
राज्यस्तरीय विश्वस्त परिषदेसाठी व्यापक तयारी
५ डिसेंबर रोजी अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय विश्वस्त परिषदेत राज्यभरातील मंदिरांचे विश्वस्त, पदाधिकारी व धार्मिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. मंदिर व्यवस्थापन, कायदेशीर बाबी, देवस्थानांच्या जमिनींचे संरक्षण, मंदिरांच्या विकासासाठी आवश्यक उपाययोजना आणि विश्वस्तांच्या विविध समस्यांवर या परिषदेत मार्गदर्शन व विचारविनिमय होणार आहे.मंदिर विश्वस्तांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचविणे आणि त्यांच्या निराकरणासाठी प्रभावी व्यासपीठ निर्माण करणे, हा या परिषदेचा प्रमुख उद्देश आहे.या शिष्टमंडळात महाराष्ट्र देवस्थान समितीचे निलेश टवलारे, कैलाशकुमार पनपालिया, आशिष मारुडकर, कैलाश गिरोळकर, रोहन ढोमणे, विनोद वानखडे, नरेश दिघडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.महाराष्ट्र देवस्थान समितीच्या या पुढाकारामुळे राज्यातील मंदिरांच्या विविध प्रश्नांना शासनस्तरावर प्रभावीपणे मांडण्याची संधी उपलब्ध झाली असून, ५ डिसेंबरच्या राज्यस्तरीय विश्वस्त परिषदेकडे संपूर्ण महाराष्ट्रातील मंदिर विश्वस्तांचे लक्ष लागले आहे.
