प्रशासनाच्या हस्तक्षेपामुळे डायलिसिस रुग्णांना मोठा दिलासा
नांदगाव खंडेश्वर / उत्तम ब्राम्हणवाडे
राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी महाडायलिसिस (मोफत डायलिसिस सेवा) योजनेला निधीची चणचण भासू लागल्याने राज्यातील अनेक गरीब आणि गरजू रुग्णांना मोठा फटका बसत होता. प्रकल्पासाठी आवश्यक निधी उपलब्ध न होणे आणि साहित्याचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे राज्यातील १०८ ठिकाणी ही सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यात आली होती.
कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे शासनाकडे ११०० कोटी रुपये थकीत आहेत त्यापैकी शासनाने २८ कोटी रुपये कर्मचाऱ्यांना अदा केलेत उर्वरित रक्कम रक्कम शासनाकडे थकीत असल्याने ही सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद निर्णय घेण्यात आला होता. याबाबत अनेक वृत्तपत्रात बातमी प्रकाशित झाल्यानंतर शासन प्रशासन खडबडून जागे झाले आणि ही सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आला.ही सेवा बंद होणार असल्याने नियमित डायलिसिसवर अवलंबून असलेल्या रुग्णांसमोर मोठे संकट निर्माण झाले होते.मात्र या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधल्यानंतर आरोग्य विभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवून सेवा पूर्ववत करण्यासाठी हालचाली सुरू केल्या. प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर बंद पडलेली डायलिसिस सेवा पुन्हा सुरू करण्यात आली असून रुग्णांचे नियमित डायलिसिस सुरू झाले आहे.त्यामुळे अनेक दिवसांपासून उपचाराच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

महाडायलिसिस योजना ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील किडनी विकारग्रस्त रुग्णांसाठी जीवनदायी ठरत आहे. खासगी रुग्णालयांमध्ये डायलिसिस उपचारासाठी मोठा खर्च येत असल्याने सर्वसामान्य रुग्णांना हे उपचार परवडत नाहीत. अशा परिस्थितीत शासनाच्या मोफत डायलिसिस योजनेचा मोठा आधार मिळत होता.मात्र निधी आणि आवश्यक साहित्याअभावी सेवा बंद झाल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयांचा आधार घेण्याची वेळ आली होती.संबंधित संस्थेकडून सेवा बंद ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. डायलिसिस वेळेवर न झाल्यास रुग्णांच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असल्याने या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेणे आवश्यक होते.दरम्यान प्रशासनाच्या तत्परतेमुळे सेवा पुन्हा सुरू झाल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांनाही डायलिसिस उपचार पुन्हा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.मात्र केवळ तात्पुरती सेवा सुरू करून प्रश्न सुटणार नाही. राज्यातील सर्व डायलिसिस केंद्रे नियमित सुरू राहण्यासाठी शासनाने पुरेसा निधी उपलब्ध करून देणे,कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर देणे आणि आवश्यक वैद्यकीय साहित्याचा पुरवठा कायम ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा पुन्हा निधीअभावी सेवा बंद पडल्यास त्याचा थेट परिणाम गरीब आणि गरजू रुग्णांच्या आरोग्यावर होऊ शकतो.त्यामुळे राज्य शासनाने महाडायलिसिस योजनेला कायमस्वरूपी आर्थिक आधार देऊन राज्यातील रुग्णांना अखंडित मोफत डायलिसिस सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
