पुलाचे काम पूर्ण, पण मुख्य रस्त्याची चाळण कायम — प्रवासी, विद्यार्थी, नागरिक आणि शेतकरी त्रस्त
नांदगाव खंडेश्वर / तालुका प्रतिनिधी
सावरगाव फाटा ते नांदगाव खंडेश्वर दरम्यानचा मुख्य रस्ता आणि शेतीशिवार पाणंद रस्ते अक्षरशः खड्डेमय व धोकादायक अवस्थेत पोहोचले आहेत. साधारणतः आठ किलोमीटरचा हा अत्यंत महत्त्वाचा रस्ता गेल्या पाच वर्षांपासून रखडलेला असून, काही ठिकाणी रस्ता गुळगुळीत तर काही ठिकाणी चाळण झाल्यासारखा फुटलेला दिसतो.दरम्यान, रस्त्यावरील पुलाचे काम पूर्ण झाले असले तरी मुख्य रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु न झाल्याने वाहनचालक, विद्यार्थी, रोजंदारी कामगार, नागरिक तसेच शेतकरी मोठ्या प्रमाणात त्रस्त आहेत.

नांदगाव खंडेश्वर तालुक्यात पोहोचण्यासाठी हा रस्ता सर्वात जवळचा आणि मुख्य मार्ग असल्याने त्याचे महत्त्व अधिक आहे. मात्र रस्त्याच्या विदारक स्थितीमुळे वाहनांची मोडतोड, अपघातांचा वाढता धोका व प्रवासाचा त्रास वाढला आहे.नागरिकांनी संबंधित प्रशासनाकडे तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली असून, रस्त्याची तातडीने दखल घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे.
