पिक विम्यातून नांदगाव खंडेश्वर तालुका वगळला; संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांमध्ये संताप.
नांदगाव खंडेश्वर /तालुका प्रतिनिधी
सततची नापिकी, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तींचा सामना करत असलेल्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांना २०२५-२६ या वर्षाच्या पिक विमा योजनेतून वगळण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाचा हा निर्णय अन्यायकारक असून त्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा असल्याची भावना व्यक्त होत आहे.

तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना शेतकऱ्यांना विमा संरक्षणापासून वंचित ठेवणे हे शासनाच्या आडमुठ्या आणि शेतकरीविरोधी धोरणाचे उदाहरण असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. नैसर्गिक संकटांमुळे उत्पादन खर्च वाढला, उत्पन्न घटले आणि कर्जाचा बोजा वाढला असताना पिक विमा हीच शेतकऱ्यांची शेवटची आशा होती. मात्र तीही हिरावून घेतल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.शेतकरी संघटना व ग्रामस्थांनी शासनाकडे त्वरित हस्तक्षेपाची मागणी केली असून, अन्यथा तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
“सततच्या नापिकीमुळे शेतकरी आधीच अडचणीत आहे. अशा परिस्थितीत पिक विम्यापासून वंचित ठेवणे हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. शासनाने तातडीने निर्णयाचा फेरविचार करून तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना विमा संरक्षण द्यावे.”
–किशोर राऊत, शेतकरी लोणी टाकळी, नांदगाव खंडेश्वर
“नैसर्गिक आपत्तींचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांनाच बसतो. पिक विमा मिळाला नाही तर शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान भरून काढणे अशक्य होईल. शासनाने शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन तातडीने योग्य निर्णय घ्यावा.”
— दिपक बोबडे, स्थानिक शेतकरी
