राज्य शासनाने विकासनिधी मंजूर करावा
लोणी (टाकळी) येथील मंदिराच्या जीर्णोद्धाराची मागणी
नांदगाव खंडेश्वर / उत्तम ब्राम्हणवाडे / पवन इंगोले
जगद्गुरू, प्रज्ञाचक्षू संत म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात आदराने स्मरण केले जाणारे संत गुलाबराव महाराज यांच्या जन्मभूमी असलेल्या लोणी (टाकळी) येथील संत गुलाबराव महाराज संस्थानाला शासनाचा ‘ब’ दर्जा प्राप्त असूनही अपेक्षित विकास झालेला नसल्याने भाविक व ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
संत गुलाबराव महाराजांचे विचार, साहित्य आणि अध्यात्मिक कार्य आजही लाखो भाविकांना प्रेरणा देत असताना त्यांच्या जन्मभूमीवरील मंदिर परिसर मात्र मूलभूत विकास कामांपासून वंचित असल्याचे चित्र आहे. मंदिराचा जीर्णोद्धार, परिसर सुशोभीकरण, भाविकांसाठी आवश्यक सुविधा तसेच तीर्थक्षेत्र विकास आराखडा राबविण्याची मागणी जोर धरत आहे.यासोबतच संतांच्या स्मृती जतन करण्यासाठी “गुलाब वाटिका“( गार्डन व पर्यटन) प्रकल्प उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव पुढे आला असून त्यासाठी सुमारे १० एकर जमिनीची आवश्यकता असल्याचे सांगण्यात येत आहे. या माध्यमातून संत साहित्य अभ्यास केंद्र, ध्यानधारणा केंद्र, वाचनालय, उद्यान आणि भाविकांसाठी विविध सुविधा उभारण्याचा मानस आहे.

या मागण्यांसाठी विनय देशमुख (अध्यक्ष), दीपक बोबडे (उपाध्यक्ष), अशोक सवाई (सचिव) तसेच सदस्य किशोर राऊत, गोरखनाथ कडू, सचिन गायगोल, जितेंद्र शिंदे आणि प्रवीण सवाई हे सातत्याने पुढाकार घेत असून शासन स्तरावर पाठपुरावा करत आहेत.स्थानिकांच्या मते, संत गुलाबराव महाराजांचे कार्य जागतिक स्तरावर पोहोचले असताना त्यांच्या जन्मभूमीचा सर्वांगीण विकास होणे ही काळाची गरज आहे. मंदिराचा जीर्णोद्धार, गुलाब वाटिका प्रकल्प आणि तीर्थक्षेत्र विकासासाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्याची मागणी भाविकांकडून होत आहे.
मुख्यमंत्री फडणवीस संत गुलाबराव महाराजांच्या जन्मभूमीत येणार का.?
राज्यस्तरीय जयंतीमुळे श्रीक्षेत्र लोणी (टाकळी) चर्चेत
संत गुलाबराव महाराज यांची जयंती महाराष्ट्र शासनामार्फत राज्यभर शासकीय स्तरावर साजरी करण्याचा ऐतिहासिक निर्णय झाल्यानंतर त्यांच्या कार्य व विचारधारेबाबत नव्याने उत्सुकता निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील श्रीक्षेत्र लोणी (टाकळी) या संतांच्या जन्मभूमीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले गेले आहे.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ६ जुलै २०२६ रोजी श्री क्षेत्र लोणी (टाकळी) येथे भेट देण्याची शक्यता व्यक्त होत आहे. नुकत्याच मंत्रालयात झालेल्या सदिच्छा भेटीत संत गुलाबराव महाराजांचे साहित्य, तत्त्वज्ञान आणि राज्यस्तरीय जयंती उत्सवाच्या आयोजनाबाबत मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा झाल्याची माहिती संत गुलाबराव महाराज साहित्य प्रचार मोहिमेचे प्रमुख माधुर्य ठाकरे यांनी दिली.मुख्यमंत्र्यांचा संभाव्य दौरा निश्चित झाल्यास संतांच्या जन्मभूमीच्या विकासाला नवी दिशा मिळण्यासह राज्यभरातील भाविकांचे लक्ष श्रीक्षेत्र लोणी (टाकळी)कडे वेधले जाणार आहे.
“संत गुलाबराव महाराजांची जयंती राज्यभर शासकीय स्तरावर साजरी होणे ही जन्मभूमीसाठी गौरवाची बाब आहे. मुख्यमंत्र्यांच्या संभाव्य भेटीमुळे श्रीक्षेत्र लोणी (टाकळी)च्या विकासाला नवी दिशा मिळेल.”
– अशोक सवाई, सचिव संत गुलाबराव महाराज संस्थान, लोणी (टाकळी)
“संत गुलाबराव महाराजांचे तत्त्वज्ञान, साहित्य आणि समाजप्रबोधनाचे कार्य राज्यातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. शासनाने घेतलेला निर्णय हा संतांच्या कार्याला मिळालेला मोठा सन्मान असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संभाव्य भेटीमुळे राज्यस्तरीय जयंती उत्सवाला ऐतिहासिक स्वरूप प्राप्त होईल.”
– माधुर्य ठाकरे, प्रमुख, संत गुलाबराव महाराज साहित्य प्रचार मोहीम
