नांदगाव खंडेश्वर /उत्तम ब्राम्हणवाडे
हादगा हे अत्यंत उपयुक्त औषधी गुणधर्म असलेले झाड आहे. याच्या फुलांचा, पानांचा आणि सालीचा आयुर्वेदात विविध प्रकारे उपयोग केला जातो. हादग्याच्या फुलांची भाजी आणि भजी अतिशय चविष्ट लागतात.मात्र स्वयंपाक करण्यापूर्वी प्रत्येक फुलामधील कडक दांडा काढून टाकावा.
बेसन लावून केलेली हादग्याच्या फुलांची कोरडी भाजी विशेष स्वादिष्ट होते.पूर्वी ग्रामीण भागात सहज उपलब्ध असणाऱ्या या भाज्या आजकाल फारशा दिसत नाहीत. संस्कृतमध्ये हादग्याला ‘अगस्ता’ असे म्हणतात. आयुर्वेदात मनःशिळा शुद्ध करण्यासाठी हादग्याच्या पानांच्या रसाचा उपयोग सांगितला आहे. तसेच, ठेच लागलेल्या किंवा जखमी झालेल्या भागावर हादग्याची पाने ठेचून बांधल्यास जखम लवकर भरून येण्यास मदत होते.जगभरात हादग्याच्या झाडाच्या सुमारे ५० प्रजाती आढळतात. त्यापैकी चार प्रमुख प्रजाती विशेष महत्त्वाच्या मानल्या जातात. ‘सीता‘ या प्रजातीला पांढरी फुले येतात, ‘पीता‘ प्रजातीला पिवळ्या रंगाची फुले येतात, ‘नीला‘ प्रजातीला निळ्या रंगाची फुले येतात, तर लाल रंगाची फुले येणाऱ्या प्रजातीला ‘लोहिता’ असे म्हणतात.निसर्गाने दिलेली ही पौष्टिक आणि औषधी देणगी जपणे व तिचा आहारात समावेश करणे, आपल्या आरोग्यासाठी निश्चितच लाभदायक ठरू शकते.
