केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरीं यांच्या ‘ग्रीन सिग्नल’ची प्रतीक्षा!
अमरावती-यवतमाळ महामार्गाच्या आधुनिकतेसाठी नांदगाववासीयांची आग्रही मागणी.
M.S.R.D.C. चा हायटेक प्रस्ताव दिल्लीत मंजुरीच्या प्रतीक्षेत.
नांदगाव खंडेश्वर / उत्तम ब्राम्हणवाडे
अमरावती आणि यवतमाळ या दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांची जीवनवाहिनी असणाऱ्या राज्य महामार्ग क्रमांक १४ च्या सिमेंटी करणासह चौपदरीकरण आणि सौंदर्यीकरणासाठी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील नागरिकांनी आता एकत्र येत आग्रही भूमिका घेतली आहे हामहामार्ग उत्तर व दक्षिण कॉरिडोर जोडण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्यासीमेवरील अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील भोकरबर्डी या गावापासून हरीसाल,सेमाडोह, परतवाडा, अमरावती,बडनेरा, नांदगाव खंडेश्वर, नेर परसोपंत, यवतमाळ,उमरी,पासून पांढरकवडा तालुक्यातील करंजी पर्यंत हा मार्ग होणार असून त्याहीपुढे तो आंध्र प्रदेश मध्ये जाणार असल्याचे समजते.
या प्रमुख राज्य महामार्गाचा कायापालट करण्यासाठी बडनेरा ते यवतमाळ जिल्ह्यातील नेर परसोपंतपर्यंत संपूर्ण सिमेंट रस्ता आणि चौपदरीकरण करण्यात यावे,अशी विनंती परिसरातील जनतेकडून सातत्याने केली जात आहे. या संदर्भातील सर्वसमावेशक विकासाचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव सध्या केंद्रीय सडक परिवहन व महामार्ग मंत्रालयाकडे अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. देशात राष्ट्रीय महामार्गांचे जाळे विणणारे केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांनी या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालून या प्रस्तावाला लवकरात लवकर मंजुरी द्यावी.अशी आशा आता नांदगाववासीयांना लागली आहे.
‘समृद्धी महामार्गाशी’ थेट कनेक्टिव्हिटी!
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) राज्य महामार्ग क्रमांक १४ च्या एकूण ८४.३० किलोमीटर लांबीच्या रस्त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) चौपदरीकरणासाठी तयार केला आहे. यामध्ये अमरावतीच्या बडनेरा भागातील ३६.४० किमी आणि यवतमाळच्या बाजूने ४७.९० किमी रस्त्याचा समावेश आहे. हा महामार्ग थेट ‘समृद्धी महामार्गाला’ जोडणारा मुख्य दुवा ठरणार असल्याने या भागाच्या औद्योगिक व आर्थिक प्रगतीसाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. मात्र प्रशासकीय मंजुरीच्या प्रक्रियेत हा प्रस्ताव अडकल्यामुळे या मार्गाच्या प्रत्यक्ष कामाला अद्याप सुरुवात होऊ शकलेली नाही.वाढती वाहतूक आणि प्रवाशांची कोंडीसध्या या महामार्गावर चिंतेचा विषय बनली असून या महामार्गावर दिवसेदिवस वाहनांची संख्या कमालीची वाढत आहे. रस्ता दुपदरी आणि काही ठिकाणी अत्यंत खराब अवस्थेत असल्याने येथे सातत्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. या महामार्गावरील अनेक ठिकाणी खड्ड्यांमुळे प्रवासाचा वेळ वाढला असून लहान-मोठ्या अपघातांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी आणि पावसाळ्यात या मार्गावरून प्रवास करणे वाहनधारकांसाठी अत्यंत कठीण आणि जोखमीचे बनले आहे. हा रस्ता संपूर्ण सिमेंटचा आणि चौपदरी झाल्यास अमरावती आणि यवतमाळ दरम्यानचा प्रवास अधिक गतिमान,सुखकर आणि सुरक्षित होणार आहे.
स्थानिक अर्थकारणाला गती मिळण्याची अपेक्षा!
हा महामार्ग नांदगाव खंडेश्वर तालुक्यातून जात असल्याने,या रस्त्याच्या चौपदरीकरणामुळे नांदगाव खंडेश्वरच्या विकासाला मोठी गती मिळणार आहे. आणि या परिसरातील शेतकऱ्यांना आपला शेतीमाल,कापूस, सोयाबीन आणि भाजीपाला अमरावती किंवा यवतमाळच्या बाजारपेठेत तसेच समृद्धी महामार्गाने इतर मोठ्या बाजार पेठेत जलदगतीने पोहोचवणे सोपे होईल.तसेच रस्ता चांगला झाल्यास स्थानिक पातळीवर व्यापार आणि छोट्या उद्योगांना चालना मिळून सुशिक्षित तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात.

निर्णयाकडे लागल्या नजरा.
“केंद्रीय सडक परिवहन मंत्री.ना. नितीन गडकरी यांनी देशभरात रस्त्यांचे उत्तम काम केले आहे. आमच्या या महत्त्वाच्या महामार्गाचा प्रस्तावही त्यांच्याकडे सादर झाला असून,त्यांनी विदर्भातील या महत्त्वपूर्ण वाहिनीला न्याय द्यावा,” अशी मागणी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील आणि परिसरातील नागरिकांनी केली आहे. या विभागाच्या लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केला नसला तरी केंद्रीय मंत्र्यांनी स्वतः या गंभीर प्रश्नात लक्ष घालून निधी मंजूर करावा.अशी आग्रही मागणी तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांनी केली आहे.

