फुटलेल्या काचेची ‘लालपरी’ धावतेय रस्त्यावर;
अपघात झाल्यास जबाबदार कोण? बहुजन मुक्ती पार्टीचे बिमोद मुधाने यांचा थेट सवाल
नांदगाव खंडेश्वर/उत्तम ब्राम्हणवाडे
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (MSRTC) नवीन ‘लालपरी’ बस समोरील काच पूर्णपणे फुटलेल्या अत्यंत धोकादायक अवस्थेत रस्त्यावरून धावत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. MH 14 MH 1976 या क्रमांकाची ही बस माहूर-यवतमाळ-अमरावती-मोर्शी या मार्गावर प्रवाशांची वाहतूक करत आहे. चालकाच्या समोरील मुख्य काच फुटलेली असतानाही ही बस राजरोसपणे प्रवाशांनी भरून धावत असल्याने, एसटी प्रशासन प्रवाशांच्या आणि चालकाच्या जीवाशी खेळत आहे का, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.
दिनांक ६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९:४४ च्या सुमारास बहुजन मुक्ती पार्टीचे यवतमाळ-वाशीम लोकसभा अध्यक्ष बिमोद मुधाने हे अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार गजानन उल्हे पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात होते. वाटेत नाश्ता व पाण्यासाठी ते नांदगाव (खंडेश्वर)तालुक्यातील शिंगणापूर फाट्यावरील बस थांब्यावर थांबले असता, त्यांना ही फुटलेल्या काचेची बस प्रवाशांना घेण्यासाठी थांबलेली दिसली.

सहा महिने काच बदलता येत नाही? चालकाचे अजब उत्तर! दिल्याने प्रवाशात संतापाच लाट दिसून आली.बिमोद मुधाने यांनी तातडीने बस चालकाजवळ जात, “समोरील काच एवढा फुटलेला असताना गाडी कशी चालवता? आगार व्यवस्थापकांना (DM) सांगून हा काच बदलून का घेत नाही?” असा जाब विचारला. त्यावर चालकाने “गाडीला सहा महिने पूर्ण व्हायचे आहे.६ महिन्यांपर्यंत हा काच बदलता येऊ शकत नाही,” असे अजब आणि हतबलतेचे उत्तर दिले. चालकाच्या या उत्तरामुळे एसटी महामंडळाच्या ढिसाळ नियोजनाचे धिंडवडे निघाले आहेत.
खड्डेमय रस्ता आणि अपघाताची भीती
अमरावती ते यवतमाळ या मार्गावरील रस्त्याची अवस्था अत्यंत दळभदळी झाली आहे. रस्त्यावर खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता, हेच समजत नाही. अशा खडबडीत आणि खराब रस्त्यावरून धावताना बसला लागणाऱ्या हादऱ्यांमुळे हा फुटलेला काच कधीही निघून चालकाच्या अंगावर किंवा प्रवाशांवर कोसळू शकतो. यामुळे मोठा अपघात घडल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न बिमोद मुधाने यांनी उपस्थित केला आहे.
“अशा अत्यंत धोकादायक अवस्थेत गाड्या रस्त्यावर उतरवून प्रवाशांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार प्रशासनाला कोणी दिला? मोर्शी आगाराने या गाडीचा समोरील काच त्वरित बदलावा. जर या फुटलेल्या काचेमुळे पुढील काळात काही अपघात किंवा जीवितहानी झाली, तर त्याला संपूर्णपणे मोर्शीचे आगार व्यवस्थापक (DM) जबाबदार असतील.”
— बिमोद मुधाने (लोकसभा अध्यक्ष, बहुजन मुक्ती पार्टी, यवतमाळ-वाशीम)
धोकादायक लालपरीचा हा फोटो सध्या सोशल मीडियावरही व्हायरल होत असून, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने तात्काळ जागे होऊन या बसची दुरुस्ती करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
