स्वीकृत नगरसेवक अविनाश ब्राम्हणवाडे यांचे नगरपंचायतीला तीव्र निवेदन.
नांदगाव खंडेश्वर /तालुका प्रतिनिधी
प्रधानमंत्री आवास योजना तथा घरकुल योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना गेल्या तीन महिन्यांपासून निधी न मिळाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर स्वीकृत नगरसेवक अविनाश ब्राम्हणवाडे यांनी नगरपंचायत प्रशासनाला तीव्र निवेदन सादर करून तात्काळ निधी वितरित करण्याची मागणी केली आहे.निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अनेक गरीब व गरजू लाभार्थ्यांनी प्रशासनाच्या सूचनेनुसार आपली जुनी घरे पाडून नवीन घरांच्या बांधकामास सुरुवात केली. मात्र, तीन महिने उलटूनही योजनेअंतर्गत मिळणारी धनादेशाची रक्कम अथवा निधी प्राप्त झालेला नाही. परिणामी अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळले असून त्यांचे बांधकाम अर्धवट अवस्थेत थांबले आहे.काही लाभार्थ्यांना घर नसल्यामुळे भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली आहे, तर काहींना नातेवाईकांकडे आश्रय घ्यावा लागत आहे. वाढत्या महागाईच्या काळात निधीअभावी नागरिकांचे मोठे हाल होत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.अविनाश ब्राम्हणवाडे यांनी प्रशासनाकडे प्रलंबित सर्व लाभार्थ्यांना तात्काळ निधी वितरित करावा, निधी वितरणातील विलंबाची चौकशी करावी तसेच ज्यांनी घरे पाडली आहेत अशा लाभार्थ्यांना प्राधान्याने मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.दरम्यान, यासंदर्भात तातडीने कार्यवाही न झाल्यास नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी नगरपंचायत प्रशासनाला दिला आहे.
