महागाईमुळे कॅटरिंग व्यवसाय अडचणीत;वाढते दर – घटते व्यवसायाचे गणित
अंजनगाव बारी/ पवन इंगोले
सध्या महागाईने सर्वसामान्यांसह कॅटरिंग व्यवसायालाही जबरदस्त फटका बसला आहे. भाज्या, तांदूळ, डाळी, गहू, मसाले, खाद्यतेल, गॅस सिलिंडर आणि पॅकिंग साहित्य यांच्या प्रचंड दरवाढीमुळे कॅटरिंग सेवा पुरवणे पूर्वीसारखे शक्य होत नाही. कार्यक्रम वाढले, मागणी आहे; पण खर्चाने अशी बिकट स्थिती निर्माण केली आहे की कॅटरर्सना दर वाढवण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.ग्राहक मात्र जुन्याच दरात दर्जेदार सेवा हवी अशी अपेक्षा ठेवत असल्याने कॅटरिंग व्यावसायिकांचे आर्थिक गणित कोलमडून गेले आहे. लग्न, वाढदिवस, जत्रा, समाजभोजन कोणताही कार्यक्रम असो—खर्चाच्या विळख्यात हा व्यवसाय अडकलेला आहे.दरवाढीचा थेट परिणाम म्हणजे कार्यक्रमांचे कोटेशन वाढत आहेत, नफा मोठ्या प्रमाणात कमी होत आहे, कामगारांना पगार देणे कठीण झाले असून लहान कॅटरिंग व्यावसायिक व्यवसाय बंद करण्याच्या स्थितीत पोहोचले आहेत. महागाईचा ताण वाढत असताना या क्षेत्राला तातडीने सरकारी मदतीची गरज असल्याचे मत सर्व कॅटरिंग व्यावसायिकांनी व्यक्त केले.
“महागाईने कॅटरिंग क्षेत्र धोक्यात आले आहे. दर्जा राखायचा आणि ग्राहक समाधान द्यायचे, पण खर्च एवढे वाढले आहेत की जुने दर ठेवणे आता अशक्य झाले आहे. सरकारने कॅटरिंग व्यवसायाला मदत करण्यासाठी काहीतरी ठोस पावले उचलावीत,”
— अक्षय धुर्वे, कॅटरिंग व्यावसायिक
“महागाईने आमचे दररोजचे गणितच बिघडवले आहे. ग्राहकांना सेवा द्यायची आहे, पण खर्च एवढे वाढले की नुसते कोटेशन देतानाही भीती वाटते. सरकारने आमचा आवाज ऐकण्याची गरज आहे.”
– मयुर जुमडे, कॅटरिंग ठेकेदार
