गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल.
अमरावती /जिल्हा प्रतिनिधी
शहरातील पंचवटी ते पॉवर हाऊस परिसरामध्ये बेकायदेशीर सावकारी (व्याजटक्के) करून नागरिकांना त्रास देणाऱ्या आणि दहशत निर्माण करणाऱ्या एका संशयिताविरुद्ध तडीपारीची प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी,अशी मागणी करणारा तक्रार अर्ज अमरावतीच्या पोलीस आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे.
शाम कुणबी थोप यांनी हा अर्ज दाखल केला असून यामध्ये मसानगंज परिसरातील रहिवासी मोहन नथुराम विश्वकर्मा याच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. संबंधित संशयित व्यक्ती हा पंचवटी ते पॉवर हाऊस भागात बेकायदेशीरपणे अवैध सावकारीचा व्यवसाय चालवत असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांकडून समोर येत आहेत.तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, या संशयित व्यक्तीची वर्तणूक अत्यंत आक्रमक असून, त्याच्याकडून चाकू आणि लाठीसारखी घातक हत्यारे काढून नागरिकांना धमकावले जात असल्याचे व्हिडिओ पुरावेही अर्जासोबत पोलिसांना सादर करण्यात आले आहेत. तसेच या आरोपीविरुद्ध गाडगेनगर पोलीस ठाण्यात यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. त्याच्या या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि संबंधित व्यक्तीवर तडीपारीची कडक कारवाई करण्यात यावी, अशी विनंती अर्जदाराने केली आहे. या तक्रार अर्जाच्या प्रतिलिपि राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री,अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री, अमरावती विभागीय आयुक्त आणि पोलीस महासंचालक यांच्याकडेही पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी पाठवण्यात आल्या आहेत. पोलीस प्रशासन आता यावर काय पाऊल उचलते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
