झाडांची घटती संख्या,वाढते सिमेंटचे बांधकाम ठरतेय अधिवासासाठी धोकादायक.
नांदगाव खंडेश्वर / उत्तम ब्राम्हणवाडे
पूर्वजांचे स्मरण करून त्यांच्या आत्मशांतीसाठी प्रार्थना करण्याची आणि श्रद्धेने नैवेद्य अर्पण करण्याची पितृपक्षातील परंपरा पिढ्यान्पिढ्या चालत आली आहे. या परंपरेत कावळ्याला विशेष महत्त्व आहे. पितृपक्षात घराबाहेर किंवा अंगणात नैवेद्य ठेवून कावळ्याची वाट पाहिली जाते.कावळ्याने नैवेद्य स्वीकारला की पूर्वजांनी तो स्वीकारल्याची श्रद्धा अनेक कुटुंबांमध्ये आजही कायम आहे.
मात्र बदलती जीवनशैली वाढते सिमेंटचे बांधकाम आणि पर्यावरणातील बदलांमुळे पितृपक्षात नैवेद्याची वाट पाहणारे कावळे पूर्वीच्या तुलनेत कमी दिसत असल्याचे चित्र अनेक गावांमध्ये पाहायला मिळत आहे.यंदाचा पितृपक्ष २६ सप्टेंबरपासून सुरू झाला असून सध्या पितृपक्षाचे दिवस सुरू आहेत. साधारण १५ वर्षांपूर्वीच्या तुलनेत आजच्या ग्रामीण जीवनात मोठा बदल झाला आहे. पूर्वी गावातील नातेवाईक,पाहुणे,मित्रमंडळी तसेच शेजारी पितृपक्षातील भोजनासाठी आवर्जून एकत्र येत असत. एखाद्या घरातील पंगतीत शंभर ते दीडशे जण सहज जेवत असत.आता मात्र कुटुंबांचा आकार कमी झाला असून बदलत्या सामाजिक जीवनशैलीमुळे अशा सामूहिक भोजनाच्या परंपरेलाही मर्यादा आल्या आहेत.

पितृपक्षातील नैवेद्याची परंपरा आणि कावळ्यांचे अस्तित्व यांचा ग्रामीण भागात जवळचा संबंध राहिला आहे. मात्र, गावांमध्ये पूर्वी मोठ्या प्रमाणात असलेली झाडे दिवसेंदिवस कमी होत आहेत.मोकळ्या जागांवर सिमेंटची बांधकामे उभी राहत असून नैसर्गिक परिसरही कमी होत आहे. त्यामुळे कावळ्यांसह अनेक पक्ष्यांना घरटी बांधण्यासाठी आणि सुरक्षित अधिवासासाठी आवश्यक जागा कमी होत असल्याचे पर्यावरणप्रेमींचे मत आहे.पूर्वी सकाळच्या वेळी गावातील मोठ्या झाडांवर कावळ्यांचा कावकाव ऐकू येत असे. मात्र, आता अनेक गावांमध्ये हा आवाज पूर्वीइतका ऐकू येत नाही. मोठी झाडे तोडली जाणे त्यांच्या जागी सिमेंटची बांधकामे होणे आणि ग्रामीण भागाचे झपाट्याने बदलणारे स्वरूप याचा कावळ्यांच्या अधिवासावर परिणाम होत आहे.याशिवाय प्लास्टिकचा वाढता वापर आणि कचऱ्याच्या बदललेल्या स्वरूपाचाही पक्ष्यांच्या खाद्यसाखळीवर परिणाम होत आहे. पूर्वी गावांमध्ये नैसर्गिक पद्धतीने उपलब्ध होणारे अन्न कावळ्यांना सहज मिळत असे. आता मात्र प्लास्टिकमिश्रित कचरा वाढल्याने त्यांच्या नैसर्गिक अन्नस्रोतांमध्येही बदल झाला आहे.पितृपक्षाच्या काळात कावळा नैवेद्य स्वीकारण्यासाठी येण्याची प्रतीक्षा करणाऱ्या कुटुंबांना आता पूर्वीप्रमाणे सहज कावळा दिसत नसल्याने चिंता व्यक्त होत आहे. धार्मिक श्रद्धेच्या या परंपरेसोबतच कावळ्यांचे संरक्षण आणि त्यांचा नैसर्गिक अधिवास जपण्याची गरजही निर्माण झाली आहे.कावळ्यांसह अनेक पक्ष्यांना सुरक्षित अधिवास मिळण्यासाठी गावागावांत मोठ्या झाडांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. विकासकामे करताना पर्यावरणाचा समतोल राखणे, जुन्या झाडांची तोड टाळणे आणि स्थानिक प्रजातींच्या वृक्षांची मोठ्या प्रमाणात लागवड करणे गरजेचे आहे. कावळ्यांची संख्या कमी होणे हा केवळ एका पक्ष्याशी संबंधित विषय नसून बदलत्या पर्यावरणाचा संकेत म्हणूनही त्याकडे पाहण्याची गरज आहे.पितृपक्षातील कावळ्याला असलेले धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेता, या निमित्ताने नागरिकांनी पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करण्याची गरज आहे. झाडे वाचली तर पक्ष्यांचा अधिवास वाचेल आणि पक्ष्यांचा अधिवास वाचला तर निसर्गाचा समतोल राखण्यास मदत होईल.
