सिमेंट रस्ते, वाढता एसी वापर, वृक्षतोड आणि चुकीच्या जलनियोजनाचा दुष्परिणाम
अंजनगाव बारी :- पवन इंगोले
जिल्हासह ग्रामीण परिसरात गेल्या काही आठवड्यांपासून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ जाणवत आहे. उष्णतेचा तडाखा, पिण्याच्या पाण्याची टंचाई, अवकाळी पावसाचे धाड, तर शेतकऱ्यांच्या शेतीकामात वाढलेली अडचण — या सर्वामुळे नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. परिसरातील बदलती जीवनशैली, वेगाने वाढणारे नागरीकरण आणि निसर्गाशी वाढती छेडछाड हे या संकटाचे प्रमुख घटक ठरत आहेत.
*तापमान वाढीमागील प्रमुख कारणे*
१) सिमेंट रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड
ग्रामीण व शहरी भागात सिमेंट रस्त्यांचे जाळे वाढताना रस्त्यांच्या कडील प्रचंड प्रमाणातील झाडे तोडली जात आहेत. हिरवळ कमी झाल्याने परिसरातील तापमान नैसर्गिकरीत्या वाढू लागले आहे. वातावरणातील थंडावा हरपून जमिनीची उष्णता झपाट्याने वाढत आहे.
२) वाढता एसी(AC) वापर आणि त्यातून निघणारा घातक वायू
एसीचा अनियंत्रित वापर वातावरणात ग्रीनहाऊस गॅसेस वाढवतो. त्याचा थेट परिणाम म्हणून पृथ्वीचे तापमान वाढून हवामानाचे नैसर्गिक चक्र बिघडत आहे. ग्लोबलायझेशनच्या वाढत्या स्पर्धेत निसर्गाची होणारी हानी चिंताजनक पातळीवर पोहोचली आहे.

३) वृक्षतोड + चुकीचे जलनियोजन = शेतकऱ्यांचा दुहेरी फटका
झाडे कमी झाल्याने तापमान वाढलेच आहे, पण पावसाळ्यात पाण्याचे योग्य साठवणूक न झाल्याने उन्हाळ्यात तीव्र टंचाई जाणवते. अवकाळी व अनियमित पावसामुळे खरीप–रब्बी हंगामांवर मोठा परिणाम होत आहे. शेतकऱ्यांना शेती करणे कठीण होत असून उत्पादन खर्च वाढत चालला आहे.
*आता तातडीने करावयाच्या उपाययोजना*
रेनवॉटर हार्वेस्टिंगची सक्ती
प्रत्येक गावात व घरांमध्ये पावसाचे पाणी साठवण्यासाठी उपक्रम राबवणे अत्यावश्यक.शेततळे, बंधारे व तळी पुनरुज्जीवन पाण्याचे शाश्वत नियोजन करून उन्हाळ्यातील टंचाई टाळता येऊ शकते.
वृक्षारोपण व संवर्धन
फक्त झाडे लावणे पुरेसे नाही, तर ती मोठी होईपर्यंत त्यांचे संगोपन करणे अधिक महत्त्वाचे.
पर्यावरणपूरक उपकरणांचा वापर वाढवणे, घरांमध्ये नैसर्गिक थंडावा टिकवणारे उपाय अवलंबणे.
सिमेंट रस्त्यांच्या नियोजनात हिरवळ जपण्यावर भररस्ते
बांधणीदरम्यान झाडे वाचविण्याच्या उपाययोजना सक्तीने राबवणे.पर्यावरणाशी सुरू असलेली छेडछाड थांबवली नाही, तर उष्णतेचा तडाखा आणखी वाढेल. नागरिक, प्रशासन आणि स्थानिक संस्था यांनी एकत्रितपणे पुढाकार घेतल्यासच येणाऱ्या पिढ्यांसाठी सुरक्षित, स्वच्छ आणि संतुलित वातावरण निर्माण करता येईल.
