गावकऱ्यांची गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार
नांदगाव खंडेश्वर /तालुका प्रतिनिधी
शिवरा गावात नागरिकांना योग्य पूर्वसूचना न देता ग्रामसभा घेण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. ग्रामसभा घेण्यापूर्वी नियमानुसार गावात नोटीस लावणे, दवंडी देणे व नागरिकांना ग्रामसभेची माहिती देणे अपेक्षित असताना, या बाबी करण्यात आल्या नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
ग्रामसभा घेण्यासाठी नागरिकांना माहिती देणे व त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करणे अपेक्षित असताना, नागरिकांना न सांगता ग्रामसभा कशी घेण्यात आली, असा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.तसेच ग्रामसेवक संघटनेच्या बहिष्कारामुळे ग्रामसेवक सहभागी होत नसल्याने ग्रामसभा वारंवार तहकूब होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र ग्रामसभा वारंवार तहकूब न करता नागरिकांना विश्वासात घेऊन लवकरात लवकर नियमानुसार ग्रामसभा घेण्यात यावी, अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.ग्रामसभा घेण्यात विलंब होत असल्याने गावातील विविध प्रश्नांवर चर्चा करून त्यांची उत्तरे मिळविण्यापासून नागरिक वंचित राहत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. लवकरात लवकर ग्रामसभा घेऊन नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यात आली नाहीत, तर आपल्या प्रश्नांची उत्तरे व वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे दाद मागण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.यापूर्वीही शिवरा ग्रामपंचायतीकडून काही ग्रामसभा नागरिकांना योग्य माहिती न देता व दवंडी न देता घेण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. त्या ग्रामसभा नेमक्या कोणत्या पद्धतीने घेण्यात आल्या, त्याबाबत नियमानुसार आवश्यक सूचना व प्रसिद्धी करण्यात आली होती का ? तसेच त्यांची कार्यवाही नियमाप्रमाणे झाली होती का, याची संबंधित विभागाने चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
