परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण.
वनविभागाने लावले कॅमेरे;दिला सतर्कतेचा इशारा.
नांदगाव खंडेश्वर / उत्तम ब्राम्हणवाडे
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वाघोडा, शेलूनटवा आणि वाईबोथ परिसरात वाघाच्या हालचालींचे पुरावे आढळून आल्याने परिसरातील शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघोडा येथील शेतकरी सुरेश पु. गावनर यांच्या शेतात शेतमजुरांना वाघाच्या पावलांचे ठसे आढळून आले. घटनेची माहिती मिळताच वन विभागाला याबाबत कळविण्यात आले.
वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून आढळलेले ठसे वाघाचे असल्याची खात्री केली. त्यानंतर वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी संबंधित परिसरात कॅमेरे लावण्यात आले असून, कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाघाचा शोध घेण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. वाघ नेमका कोणत्या दिशेने गेला आणि त्याची परिसरातील हालचाल किती आहे, याबाबत वन विभागाकडून माहिती घेण्यात येत आहे.

वाघोडा लगत असलेल्या शेलूनटवा येथील शेतशिवारातही वाघासह जंगली डुकराच्या पावलांचे ठसे आढळून आले आहेत. त्यामुळे वाघाने जंगली डुकराचा पाठलाग केला असावा, असा अंदाज शेलूनटवा परिसरातील शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. एकाच परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी वाघाच्या ठशांची नोंद झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर शेतात ये-जा करीत असून, खरीप हंगामातील शेतीची कामे सुरू आहेत. अनेक शेतकरी व शेतमजूर सकाळी लवकर तसेच सायंकाळच्या वेळी शेतात कामासाठी जातात. त्यामुळे वाघाची प्रत्यक्ष हालचाल आढळून आल्यास नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. वन विभागाने याची गांभीर्याने दखल घेत परिसरातील नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

शेतकऱ्यांनी शक्यतो एकट्याने शेतात जाऊ नये, विशेषतः पहाटे व सायंकाळच्या वेळी अधिक काळजी घ्यावी. शेतशिवारात वाघाच्या हालचालींचे ठसे किंवा अन्य संशयास्पद बाब आढळल्यास त्याच्या जवळ न जाता तत्काळ वन विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.वाघाचा शोध घेण्यासाठी लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यांमधून मिळणाऱ्या छायाचित्रे व हालचालींच्या नोंदीवर वन विभागाचे लक्ष असून, पुढील काळात वाघाची नेमकी हालचाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शेलूनटवा, वाघोडा व वाईबोथ परिसरातील शेतकऱ्यांनी घाबरून न जाता मात्र पूर्ण खबरदारी घेऊन शेतीची कामे करावीत, असे वन विभागाकडून सांगण्यात आले आहे.
