लग्नसमारंभांमध्ये वाढला डीजेचा आवाज;कारवाई कडे पोलिसांचे दुर्लक्ष.
नांदगाव खंडेश्वर/उत्तम ब्राम्हणवाडे
नांदगाव खंडेश्वर तालुक्यात लग्नसराईचा धुमधडाका सुरू झाला आहे. विशेष म्हणजे लग्नाच्या अगोदरच्या दिवशी डीजेच्या तालावर देवतांच्या पाया पडण्याचा कार्यक्रम आता नव्याने सुरू झाला आहे. त्यात पारंपरिक वाद्ये मागे पडली असून डीजेचा आवाज प्रचंड वाढला आहे. आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्या डीजेंवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही.
निवडणुकीत विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून सर्रासपणे डीजेचा वापर झालेला पाहायला मिळाला. त्याच पार्श्वभूमीवर सध्या लग्नसमारंभातही डीजेने आवाजाची मर्यादा ओलांडली आहे. लग्नसराईत पारंपरिक वाद्यांचा वापर बंद झाला असून त्याची जागा डीजेने घेतली आहे. डीजे नसेल तर लग्न होत नसल्याची भावना वाढीस लागली आहे. विशेष म्हणजे भयंकर आवाजामुळे डीजे हा आरोग्यासाठी घातक ठरू लागला आहे. डीजेच्या आवाजाने ध्वनिप्रदूषणाचा प्रश्न निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सरकारी यंत्रणांच्या वरदहस्ताने शहर आणि तालुक्यात डीजेचा दणदणाट सुरू आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना तसेच प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांना लग्नकार्यात आल्यानंतर याचा त्रास होतो. मात्र, यावर कोणीही काहीही बोलण्यास तयार होत नाही.

पोलिस प्रशासन यावर कारवाई करीत नसल्याने डीजेच्या चालकांचा आवाज वाढला आहे. ध्वनिप्रदूषणा बाबत कोणीही काही बोलण्यास तयार नाही, अशी स्थिती आहे.
प्रशासनाने घेतली बघ्याची भूमिका
ध्वनिप्रदूषणाचे सर्रास उल्लंघन होत असतानाही प्रशासनाने घेतलेली बघ्याची भूमिका आश्चर्यचकित करणारी आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश पायदळी तुडविले जात असल्याचे दिसून येते. लग्नसमारंभ हे सध्या इव्हेंट झाले असून, लाखो-करोडो रुपयांची उधळण होत आहे. त्याचबरोबर डीजेच्या भिंतीही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. राज्य मार्गावरील लग्नकार्यालयात सर्वाधिक डीजे लावण्याचे चित्र नांदगाव खंडेश्वर तालुक्यात सर्रास पाहायला मिळत आहे.
ज्येष्ठांसह लहान मुलांना त्रास
ध्वनिप्रदूषणाच्या सर्व मर्यादा ओलांडत स्पीकरच्या भिंतींनी दहशत निर्माण केली जात आहे. याचा त्रास ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना होत आहे. पोलिस यंत्रणा अशा डीजेवर कारवाई करताना दिसत नाही. त्यामुळे डीजेचालकांची मनमानी वाढली असून, कानठळ्या बसणारा आवाज परिसरात दणाणून सोडला जात आहे.डिजे हा आरोग्यासाठी घातक ठरू लागला आहे . सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार औद्योगिक क्षेत्रामध्ये दिवसा ७५ डेसीबल , रात्रीच्यावेळी ७० डेसीबल , व्यवसायिक क्षेत्रात दिवसा ६५ डेसीबल , रात्री ५५ डेसीबल ,रहिवासी क्षेत्रात दिवसा ५५ डेसीबल ,आणि रात्री ४५ डेसीबल , शांतता क्षेत्रात म्हणजे शाळा ,कालेज , रुग्णालय तसेच शासकीय कार्यालया समोर दिवसा ५०डेसीबल , रात्री ४० डेसीबल आवाजापुढे कोणीही वाजवू शकत नाही.जास्त आवाजात कोणीही डिजे वाजविला तर त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई व्हायला पाहिजे.
