लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे जनतेत तीव्र संताप
विकास फक्त कागदावरच, नागरिकांचा आरोप
नांदगाव खंडेश्वर / तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद बांधकाम विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील ग्रामीण रस्त्यांची अक्षरशः ‘चाळण’ झाली असून सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. पावसाळा तोंडावर आला असताना रस्त्यांची दुरवस्था अधिकच भीषण बनली असून नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. प्रशासनासह लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.तालुक्यातील लोणी, पापड, मंगरुळ चव्हाळा, माहुली चोर या जिल्हा परिषद सर्कलमधील बहुतांश ग्रामीण मार्गांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावरील डांबर पूर्णपणे उखडून गेले असून मोठमोठे खड्डे पडले आहेत. काही मार्गांवर गिट्टी बाहेर आली असून वाहन चालविणे धोकादायक झाले आहे. “हा रस्ता आहे की शेताचा बांध?” असा प्रश्न वाहनचालकांकडून उपस्थित केला जात आहे.

अपघातांची मालिका सुरू
रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे दुचाकीस्वार रोज अपघातग्रस्त होत आहेत. अनेकांना हात-पाय फ्रॅक्चर होण्याच्या घटना घडत असून रात्रीच्या वेळी खड्डे न दिसल्याने गंभीर अपघात होत आहेत. शेतकरी शेतमाल बाजारात नेताना वाहनांचे संतुलन बिघडून वाहने पलटी होत असल्याच्या घटनाही वाढल्या आहेत.गंभीर रुग्णांना रुग्णालयात नेताना ॲम्बुलन्सला वेळ लागत असल्याने ‘गोल्डन अवर’ वाया जात आहे. एसटी बसेसचे नुकसान वाढल्याने काही ग्रामीण भागातील फेऱ्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.निधी कोट्यवधींचा; काम मात्र निकृष्ट करण्यात आले आहे
अर्थसंकल्पीय योजना
पंचवीस-पंधरा योजना, जिल्हा वार्षिक योजना तसेच आमदार निधीमधून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होतो. मात्र प्रत्यक्षात रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची केली जातात किंवा काही ठिकाणी कामे होतच नसल्याचा आरोप केला जात आहे. कागदोपत्री विकास दाखवून बिले उचलली जात असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे.अनेक रस्त्यांचे वारंवार भूमिपूजन व उद्घाटन करण्यात येते, मात्र काही महिन्यांतच रस्ते पुन्हा खड्डेमय होत असल्याने जनतेत नाराजी वाढत आहे.
लोकप्रतिनिधींवर संताप
तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी ग्रामीण भागातील रस्त्यांच्या प्रश्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. निवडणुकीच्या काळात विकासाच्या मोठमोठ्या घोषणा केल्या जातात; मात्र निवडणुका संपल्यानंतर ग्रामीण भागातील जनतेकडे कोणीही फिरकत नसल्याची भावना व्यक्त होत आहे.ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, “२५ वर्षांत एकही रस्ता कायमस्वरूपी दर्जेदार झाला नाही. प्रत्येक पावसाळ्यात रस्त्यांची हीच अवस्था असते. लोकप्रतिनिधींना फक्त उद्घाटनांचे राजकारण आणि प्रसिद्धी हवी आहे. सामान्य जनतेच्या समस्यांशी त्यांना काहीही देणेघेणे नाही.
आंदोलनाचा इशारा
पावसाळ्यापूर्वी तालुक्यातील सर्व प्रमुख ग्रामीण रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. “रास्ता रोको” आंदोलन करण्यात येईल तसेच आगामी निवडणुकांमध्ये जनतेचा रोष मतदानातून दिसून येईल, असा इशाराही संतप्त नागरिकांनी दिला आहे.दरम्यान, संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून खड्डे बुजविण्याची आणि दर्जेदार रस्ते उभारण्याची मागणी सर्व स्तरांतून होत आहे.
