गहुला कचुला झाला कालबाह्य
साडेतीन मुहूर्तापैकी अत्यंत महत्त्वाचा एक मुहूर्त
नांदगाव खंडेश्वर/उत्तम ब्राम्हणवाडे
साडेतीन मुहुतपैिकी एक मुहूर्त म्हणून महत्व विषद केलेला दिवस म्हणजे अक्षयतृतीया अर्थात आखाजी. या दिवशी प्रत्येकजण पितरांना घास टाकतात. मोहझाडाच्या पानापासून तयार केलेल्या पत्रावळीवर शेवया, पापड, इतर जिन्नसासह बाजारातील वाण्याकडून तयार केलेल्या ‘गहुला कचुला’ घालून तयार केलेल्या चिचोणी व कैरीचे पन्हे पितरांना टाकलेला घास अपूर्णच राहतो. हल्ली बाजारात गहुला कचुला दिसेनासा होता आहे.

‘गहुला कचुला… खोबऱ्याची वाटी घेणा बायाहो…
‘अखोजीच्या चिचोणीसाठी… खोटं बोलणार नाही वाडवडीलाचा सराप घेणार नाही.’ असे सूर अक्षयतृतीयेच्या आठवड्यापुर्वीच कानावर पडायचे. हल्ली तेही कमी झालेत. सोप, जिरं, धणे, चारोळी, विलायची, लवंग, मिरे, खोबरे, खसखस, ओवा, शेंगदाणे, वाळ्याची मुळं (खस),कलमी, मोह फुलं, गराळु कंद, सुगंधित वनस्पती दवणा, चिंच बोटुक आदींचे मिश्रण तयार करुन गहुला कचुला वाणी पूर्वी तयार करत असे. कोरोना महामारीकाळात आठवडी बाजार बंद असताना ही परंपरा खंडीत झाली. बाजार पूर्ववत झाल्यानंतर वाणी यांनी गहुला कचुलाकडे पाठ फिरवली असल्याचे दिसून येते. पूर्वी वाणी आवडीने बोलीभाषेत ग्वाही देत प्रामाणिकपणे शुद्धतेची हमी देत असे. गहुला कचुला महिला पाट्यावर वाटून काही भाग अखजीच्या दिवशीच्या चिचोणी, कैरीचे पन्ह यात वापरायच्या. तर शिल्लक भाग वाळवून पुढील काळातील सण उत्सवाच्या चिचोणीत वापर करत. गहुला कचुलामध्ये वापरल्या जाणा-या जिन्नसात मसालावर्गीय, औषधी गुणधर्मासह सुंगंधीत असल्याने याचा वापर केल्या जात असे. हल्ली बाजारात क्वचीतच गहुला कचुला दिसत असल्याने कालबाह्य होणार की काय अशी शंका व्यक्त होत आहे.
आजच्या घडीला सर्व सामाजिक व्यवस्थेची घडी विस्कळीत होऊन बारा बलुतेदारी नामशेष झालेली आहे. त्या चिचोनिस लागणारे साहित्य गहुला कचुला वाण्याच्या परंपरागत दुकानात भेटे आता ते शहरी भागासह खेड्या मद्ये मिळत नाही. मसाल्याचा व्यवसाय करणारे मुस्लिम सुद्धा अगदी नचुक्ता विकत. हल्ली आपलीच मानसिकता बदलली असल्याने पूर्वी मिळणारा गहूंला कचोला दिसेनासा झालाय याची खंत वाटते.
– नितीन दुर्बुडे ,पथ्रोट
