शासकीय पत्रातील ‘त्या’ नावावरून रणकंदन.
शिंदेसेनेत तीव्र नाराजी; वरिष्ठांच्या हस्तक्षेपानंतर दौऱ्यात ऐनवेळी बदल,
दोन्ही गटांच्या पदाधिकाऱ्यांच्या घरी सदिच्छा भेट
नांदगाव खंडेश्वर / उत्तम ब्राम्हणवाडे
महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहीर यांच्या २ ऑक्टोबर रोजीच्या शासकीय दौऱ्याच्या नियोजनावरून नांदगाव खंडेश्वरच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली.शासकीय दौऱ्याच्या अधिकृत कार्यक्रमात ठाकरे गटाचे नगरसेवक प्रकाश मारोटकर यांच्या नावाचा तसेच नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा प्राप्ती मारोटकर यांच्या निवासस्थानी भेटीचा उल्लेख झाल्याने स्थानिक शिंदेसेनेच्या गोटात नाराजी व्यक्त करण्यात आल्याची चर्चा आहे.
विशेष म्हणजे उपसभापती सचिन अहीर यांच्या शासकीय दौऱ्याच्या नियोजनात स्थानिक शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना किंवा कार्यकर्त्यांना पूर्वकल्पना नसल्याची बाबही समोर आली. त्यातच विरोधी गटातील पदाधिकाऱ्याच्या निवासस्थानी भेटीचा उल्लेख अधिकृत कार्यक्रमात आल्याने या नियोजनावरून स्थानिक पातळीवर प्रश्न उपस्थित झाले.

शासकीय पत्रातील “त्या” नावामुळे चर्चेला उधाण.
उपसभापती सचिन अहीर यांच्या दौऱ्याचे शासकीय पत्रक समोर आल्यानंतर त्यातील भेटींच्या नियोजनाकडे स्थानिक राजकीय वर्तुळाचे लक्ष गेले. प्रकाश मारोटकर यांच्या नावाचा आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या निवासस्थानी भेटीचा उल्लेख असल्याने विविध राजकीय चर्चांना सुरुवात झाली.ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शासकीय दौऱ्याच्या कार्यक्रमात अशा प्रकारे विरोधी गटातील पदाधिकाऱ्याच्या निवासस्थानी भेटीचा समावेश झाल्याने स्थानिक शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाल्याचे स्थानिक सूत्रांकडून सांगण्यात आले. पक्षाचा वरिष्ठ नेता शासकीय दौऱ्यावर येत असताना स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेणे आवश्यक असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत होती.या नाराजीची माहिती वरिष्ठ पातळीवर पोहोचल्यानंतर प्रकरणाने वेगळे वळण घेतले. अमरावती जिल्ह्यातील एका विद्यमान आमदार तथा माजी मंत्र्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केल्याची माहिती समोर आली. त्यानंतर प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या आणि दौऱ्याच्या कार्यक्रमात ऐनवेळी बदल करण्यात आल्याची चर्चा आहे.
दोन्ही गटांच्या पदाधिकाऱ्यांच्या घरी सदिच्छा भेट
दरम्यान निर्माण झालेला राजकीय वाद अधिक वाढू नये, यासाठी उपसभापती सचिन अहीर यांनी दोन्ही गटांच्या पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेटी दिल्या. त्यांनी ठाकरे गटाचे नगरसेवक प्रकाश मारोटकर यांच्या निवासस्थानी भेट दिल्यानंतर शिंदेसेनेचे तालुकाप्रमुख पवन ठाकरे यांच्या निवासस्थानीही भेट दिली.दोन्ही ठिकाणी झालेल्या भेटींमुळे दौऱ्याच्या नियोजनावरून निर्माण झालेली नाराजी काही प्रमाणात शांत झाल्याचे चित्र दिसून आले. मात्र, या संपूर्ण प्रकरणामुळे शासकीय दौऱ्याच्या नियोजनात स्थानिक पदाधिकाऱ्यांना कितपत विश्वासात घेतले जाते, हा प्रश्न चर्चेत आला आहे.
थेट वरिष्ठ नेतृत्वापर्यंत तक्रार
या संपूर्ण प्रकाराबाबत शिंदेसेनेचे तालुकाप्रमुख पवन ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. शासकीय दौऱ्याच्या नियोजनात स्थानिक पदाधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली नसल्यास त्याबाबत योग्य समन्वय होणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.पवन ठाकरे यांनी सांगितले की, या प्रकाराची माहिती पक्षाच्या जिल्हास्तरीय नेतृत्वाच्या माध्यमातून वरिष्ठ पातळीवर देण्यात आली आहे. स्थानिक कार्यकर्त्यांची नाराजीही वरिष्ठांच्या निदर्शनास आणून देण्यात आली असून, याबाबत योग्य ती दखल घेतली जाईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
दौऱ्याच्या निमित्ताने राजकीय समन्वयाचा मुद्दा ऐरणीवर
उपसभापती सचिन अहीर यांच्या दौऱ्यावरून निर्माण झालेल्या या चर्चेमुळे नांदगाव खंडेश्वरमधील स्थानिक राजकारणातील अंतर्गत समीकरणेही चर्चेत आली आहेत. एका बाजूला शिंदेसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी तर दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या निवासस्थानी शासकीय दौऱ्यातील भेट यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले.अखेर दोन्ही गटांच्या पदाधिकाऱ्यांच्या घरी सदिच्छा भेट देऊन उपसभापती सचिन अहीर यांनी परिस्थिती निवळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तात्पुरता वाद शांत झाला असला तरी या घटनेमुळे शासकीय दौऱ्याचे नियोजन, स्थानिक पक्ष संघटनेशी समन्वय आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरील राजकीय हालचाली याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
