यवतमाळ-अमरावती मार्गाचे चौपदरीकरण कधी? वाढत्या वाहतुकीचा महामार्गाला विळखा
अरुंद रस्त्यावर वाहनांची प्रचंड वर्दळ;अपघातांचा धोका वाढला.
नांदगाव खंडेश्वर / उत्तम ब्राम्हणवाडे
अमरावती आणि यवतमाळ या दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांना जोडणारा यवतमाळ-अमरावती महामार्ग सध्या वाढत्या वाहतूक भारामुळे अक्षरशः दबावाखाली आला आहे.दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असताना या मार्गाची रुंदी मात्र मर्यादितच असल्याने वाहनचालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.अरुंद रस्ता,अवजड वाहनांची सततची वर्दळ,धोकादायक ओव्हरटेकिंग आणि अपघातांची वाढती शक्यता यामुळे या महामार्गाच्या चौपदरीकरणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
जिल्ह्यातील अनेक प्रमुख रस्त्यांचे चौपदरीकरण झाले असताना यवतमाळ-अमरावती हा महत्त्वाचा मार्ग अद्याप अपेक्षित विकासापासून दूर असल्याची खंत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.या महामार्गावरूनएकीकडे आंध्र प्रदेश आणि दुसरीकडे मध्य प्रदेशाकडे जाणाऱ्या वाहनांची दिवसरात्र मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. प्रवासी वाहतूक,मालवाहतूक, खासगी वाहने तसेच अवजड वाहनांचा सततचा राबता असल्याने या मार्गाचे राज्याच्या दळणवळणाच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे.याशिवाय महामार्गालगत अनेक मोठ्या लोकसंख्येची गावे असल्याने स्थानिक नागरिक,दुचाकीस्वार, पादचारी आणि प्रवासी वाहनांचीही मोठी वर्दळ असते. मात्र,वाढत्या वाहनसंख्येच्या तुलनेत रस्त्याची क्षमता अपुरी पडत असल्याने वाहतुकीचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे.
अरुंद रस्त्यामुळे ओव्हरटेकिंगचा धोका.
या मार्गावर अनेक ठिकाणी वाहनांना एकमेकांना ओलांडताना मोठी कसरत करावी लागते.विशेषतः अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे लहान वाहने आणि दुचाकीस्वारांना धोका निर्माण होतो.काही ठिकाणी समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज घेत ओव्हरटेक करणेही कठीण ठरत आहे. परिणामी,किरकोळ धडकांपासून गंभीर अपघातांपर्यंतच्या घटनांची शक्यता कायम आहे. या मार्गावर घडणारे अपघात अनेक कुटुंबांसाठी वेदनादायी ठरत आहेत. एखाद्या अपघातात कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्या कुटुंबावर आर्थिक, सामाजिक आणि मानसिक संकट कोसळते.गेलेला जीव कोणत्याही विकासकामातून परत मिळू शकत नाही. त्यामुळे रस्ते विकासाकडे केवळ सुविधा म्हणून नव्हे,तर नागरिकांच्या सुरक्षिततेचा महत्त्वाचा प्रश्न म्हणून पाहण्याची गरज आहे.

वृक्षसंवर्धन आणि रस्ते विकासाचा समतोल साधावा.
महामार्गाच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात वृक्ष असून, त्यापैकी काही वृक्ष जीर्ण आणि धोकादायक अवस्थेत आहेत. चौपदरीकरण करताना आवश्यक ठिकाणी वृक्ष हटविण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मात्र, विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचे नुकसान होऊ नये,याचीही दक्षता घेणे गरजेचे आहे.रस्त्याच्या रुंदीकरणासाठी आवश्यक तेवढेच वृक्ष हटवून त्याबदल्यात नियोजनबद्ध पद्धतीने मोठ्या प्रमाणात नवीन वृक्षारोपण करता येऊ शकते.रस्त्याच्या दुतर्फा तसेच उपलब्ध शासकीय जागांवर स्थानिक हवामानाला अनुकूल वृक्षांची लागवड आणि त्यांचे संगोपन केल्यास पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागेल. त्यामुळे पर्यावरण संरक्षण आणि रस्ते विकास यांचा समन्वय साधून चौपदरीकरणाचा मार्ग काढणे शक्य आहे.
शासनाने सर्वेक्षण करून निर्णय घ्यावा.जनतेची मागणी.
यवतमाळ-अमरावती महामार्गावरील सध्याची वाहतूक क्षमता,अपघातप्रवण ठिकाणे, भविष्यातील वाहनवाढ आणि रस्त्यालगतच्या गावांची गरज लक्षात घेऊन शासनाने तातडीने सविस्तर सर्वेक्षण करावे. त्यानुसार चौपदरीकरणाचा आराखडा तयार करून आवश्यक निधी मंजूर करावा आणि प्रत्यक्ष कामाला गती द्यावी. प्रवासी, वाहनचालक, व्यापारी, स्थानिक नागरिक तसेच विविध सामाजिक संघटनांकडून या मार्गाच्या चौपदरीकरणाची मागणी जोर धरत आहे.वाढत्या वाहतुकीचा ताण, अपघातांचा धोका आणि भविष्यातील विकासाची गरज पाहता यवतमाळ-अमरावती महामार्गाचे चौपदरीकरण आता केवळ विकासाची मागणी राहिलेली नाही,तर सुरक्षित प्रवासासाठीची अत्यावश्यक गरज बनली आहे.शासन या गंभीर प्रश्नाची दखल घेऊन कधी निर्णय घेणार,याकडे संपूर्ण परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
