आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना यांची उपस्थिती
१३ मूलभूत आरोग्य सेवांची उजळणी करून दरवर्षी प्रशिक्षण देण्याची मागणी.
नांदगाव खंडेश्वर/ तालुका प्रतिनिधी
प्राथमिक आरोग्य केंद्र मंगरूळ चवाळा येथील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी नांदगाव खंडेश्वर येथील बारी समाज भवन येथे दिनांक ५ व ६ ऑक्टोबर २०२६ रोजी दोन दिवसीय CPHC प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. आरोग्य विभागातील विविध स्तरांवर कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या प्रशिक्षणात उत्स्फूर्त सहभाग घेत प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले.
या प्रशिक्षणामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. हराळ, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी (CHO), आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, गट प्रवर्तिका तसेच सर्व आशा सेविका यांचा सहभाग होता. ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या परिसरातच सर्वसमावेशक व गुणवत्तापूर्ण प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी CPHC प्रशिक्षण महत्त्वपूर्ण मानले जाते.

CPHC चे जिल्हास्तरीय प्रशिक्षक तथा डॉ. शिरसाट सर यांचे स्वागत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्राजक्ता वानखडे यांनी केले. तसेच उपस्थित इतर सर्व प्रशिक्षक टीमचे पुष्पगुच्छ व रोप देऊन स्वागत करण्यात आले. प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षकांनी विविध विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करत प्रशिक्षणार्थींचे धैर्य, आत्मविश्वास व मनोबल वाढविण्यावर विशेष भर दिला.या दोन दिवसीय प्रशिक्षणामध्ये CPHC अंतर्गत असलेल्या १३ समग्र प्राथमिक आरोग्य सेवांबाबत प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना विविध आरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून देताना आवश्यक असलेल्या बाबी, सेवा देण्याची कार्यपद्धती तसेच आरोग्यविषयक जबाबदाऱ्या याबाबत प्रशिक्षकांनी माहिती दिली.प्रशिक्षण यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र मंगरूळ चवाळा तसेच तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. प्रशिक्षणाच्या आयोजनापासून ते प्रशिक्षणार्थींच्या सहभागापर्यंत सर्वांनी चांगल्या प्रकारे योगदान दिल्याने दोन दिवसीय प्रशिक्षण सुरळीतपणे पार पडले.अंतर्गत असलेल्या १३ मूलभूत व समग्र प्राथमिक आरोग्य सेवांची माहिती आरोग्य कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामकाजासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आरोग्य सेवांमध्ये होणारे बदल, नवीन मार्गदर्शक सूचना आणि प्रभावी अंमलबजावणी याबाबत कर्मचाऱ्यांचे ज्ञान अद्ययावत राहण्यासाठी या १३ मूलभूत सेवांचे उजळणी प्रशिक्षण दरवर्षी घेण्यात यावे, अशी मागणी आरोग्य सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली. नियमित प्रशिक्षणामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक दर्जेदार, प्रभावी आणि सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा मिळण्यास मदत होणार आहे.
