१४ वर्षीय बालकाचा शेतात अंत्यविधी; भूमिहीनांच्या अंत्यसंस्काराचा प्रश्न गंभीर.
बहुजन मुक्ती पार्टीचे बिमोद मुधाने यांचा प्रशासन व लोकप्रतिनिधींवर आरोप
नांदगाव खंडेश्वर /तालुका प्रतिनिधी
देशाला स्वातंत्र्य मिळून आठ दशके पूर्ण होत आली असतानाही ग्रामीण भागातील मूलभूत प्रश्न अद्याप कायम असल्याचे धक्कादायक चित्र नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील नांदुरा (खुर्द) येथे समोर आले आहे. गावात आजपर्यंत हक्काची स्मशानभूमी उपलब्ध नसल्याने एका १४ वर्षीय बालकाचा अंत्यविधी चक्क खासगी शेतात करण्याची वेळ कुटुंबीयांवर आली.
या घटनेमुळे गावातील स्मशानभूमीचा प्रलंबित प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, नागरिकांमध्ये प्रशासन व लोकप्रतिनिधींबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.नांदुरा (खुर्द) येथील चि. अथर्व गौतम गवई या १४ वर्षीय बालकाचा एका दिवसाच्या तापानंतर अमरावती येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अथर्वच्या निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र, अंत्यविधीची वेळ आली असता गावात अधिकृत स्मशानभूमी नसल्याची गंभीर वस्तुस्थिती पुन्हा समोर आली. अखेर अथर्वचे वडील गौतम गुलाबराव गवई यांच्याकडे स्वतःची शेतजमीन असल्याने त्यांच्या खासगी शेतातच अंत्यविधी करण्याची वेळ आली.

नांदुरा (खुर्द) आणि वाटपूर ही गटग्रामपंचायत असूनही नांदुरा (खुर्द) गावासाठी अंत्यविधीची हक्काची जागा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. त्यामुळे स्वतःची शेतजमीन असलेल्या कुटुंबाने कसेबसे अंत्यविधी पार पाडला.मात्र भूमिहीन कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यास अंत्यसंस्कार नेमके कुठे करायचे, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे पावसाळ्याच्या दिवसांत उघड्यावर अंत्यविधी करण्याची वेळ यापूर्वीही गावकऱ्यांवर आली असल्याचे सांगण्यात येत आहे.अथर्वच्या अंत्यविधीला बहुजन मुक्ती पार्टीचे यवतमाळ-वाशीम लोकसभा अध्यक्ष बिमोद मुधाने उपस्थित होते. गावातील परिस्थिती पाहून त्यांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. अंत्यविधीसाठी शेतात जाण्यासाठी साधा रस्ताही उपलब्ध नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. सायंकाळी सुमारे ६ वाजता शेतात पोहोचल्यानंतर रात्री साडेसात वाजेपर्यंत अंत्यविधीची प्रक्रिया सुरू होती. शेतात विद्युत प्रकाशाची कोणतीही व्यवस्था नसल्याने अंत्यविधीनंतर नागरिकांना अंधारातच परतावे लागले.या परिस्थितीवर संताप व्यक्त करत बिमोद मुधाने यांनी आमदार आणि खासदारांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. गावाची लोकसंख्या कमी असली तरी निवडणुकीच्या काळात मतांसाठी लोकप्रतिनिधी गावागावात पोहोचतात. मग गेल्या ८० वर्षांत नांदुरा (खुर्द) गावातील स्मशानभूमीचा प्रश्न का सुटला नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.गावातील इतर विकासकामांसाठी शासकीय निधी उपलब्ध होऊ शकतो, तर नागरिकांच्या मृत्यूनंतर अंत्यविधीसाठी आवश्यक असलेली जागा आणि शेड उभारण्यासाठी निधी का उपलब्ध करून दिला जात नाही, असा प्रश्नही मुधाने यांनी उपस्थित केला. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरही त्याला सन्मानाने अंत्यसंस्काराची जागा मिळत नसेल, तर ग्रामीण भागातील विकासाच्या दाव्यांचे वास्तव काय, असा सवाल त्यांनी केला.अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुका ज्या विधानसभा व लोकसभा मतदारसंघात येतो, त्या क्षेत्रातील लोकप्रतिनिधींनी या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी मुधाने यांनी केली. नांदुरा (खुर्द) येथे तातडीने शासकीय जागा उपलब्ध करून देत हक्काची स्मशानभूमी, अंत्यविधीसाठी शेड, रस्ता आणि प्रकाशाची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.स्वातंत्र्याला ८० वर्षे पूर्ण होत असताना एखाद्या गावात मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठीही हक्काची जागा उपलब्ध नसणे ही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींसाठी गंभीर बाब आहे. आता तरी प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा नांदुरा (खुर्द) येथील नागरिक व्यक्त करीत आहेत.
