अमरावती /जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या समृद्ध संतपरंपरेत अनेक संतांनी आपल्या तपश्चर्या, अध्यात्म आणि लोककल्याणकारी कार्याने समाजाला नवी दिशा दिली. अशाच तेजस्वी संतांपैकी एक म्हणजे श्रीक्षेत्र जळतापूर, तालुका भातकुली, जिल्हा अमरावती येथील संतश्रेष्ठ श्री परमहंस परशराम महाराज.इ.स. 1900 मध्ये बुद्ध पौर्णिमेच्या पावन दिवशी स्वर्गीय बळीरामपंत वडनेरकर गुरव व स्वर्गीय भीमाबाई यांच्या पोटी महाराजांचा जन्म झाला.
त्यांच्या जन्मावेळी संपूर्ण प्रसूतीगृह दिव्य प्रकाशाने उजळून निघाल्याचे सांगितले जाते. त्या वेळी गावातील ज्येष्ठांनी हा बालक सामान्य नसून भविष्यात लोककल्याणासाठी अवतरलेला दिव्य पुरुष असल्याचे भाकीत केले.महाराजांच्या बारशाच्या दिवशीही एक अद्भुत घटना घडल्याचे सांगितले जाते. नामकरण विधीदरम्यान त्यांच्या अंगावरील वस्त्रे आपोआप गळून पडली. त्यानंतर त्यांनी आयुष्यभर वस्त्रांचा स्वीकार केला नाही. दिगंबर अवस्थेत राहून त्यांनी वैराग्य, देहाभिमानाचा पूर्ण त्याग, आत्मज्ञान आणि ईश्वरनिष्ठ जीवनाचा आदर्श समाजासमोर ठेवला.बालपणापासूनच महाराजांमध्ये वैराग्याची भावना होती. त्यांनी अल्पवयातच गृहत्याग करून अध्यात्ममार्गाचा स्वीकार केला. विविध प्रदेशांत भ्रमण करत त्यांनी मानवतेचा, सेवाभावाचा आणि ईश्वरभक्तीचा संदेश दिला. श्रीक्षेत्र पिंपळोद, तालुका दर्यापूर, जिल्हा अमरावती येथे त्यांचा दीर्घकाळ मुक्काम राहिला.महाराजांच्या जीवनातील अनेक चमत्कार आजही भक्तांच्या श्रद्धेचा विषय आहेत. वांझ गाईला पान्हा फोडणे, मृत बैलाला जीवदान देणे तसेच मृत झालेल्या कु. मनोरमा देशमुख यांना पुन्हा जीवदान देणे, या त्यांच्या विलक्षण लीलांची भक्त आजही श्रद्धेने आठवण करतात.

खारपाण प्रदेशात जलकुंड पिंपळोद येथे गोड पाण्याचे झरे निर्माण करणे हीदेखील त्यांची एक अद्भुत लीला मानली जाते. श्री शेत्र जलकुंड पिंपळोद येथे महाराजांनी स्वतःच्या हस्ते खोदलेल्या विहिरीतील अमृतमय गोड पाणी आजही त्यांच्या कृपेची साक्ष देत असल्याचा भक्तांचा दृढ विश्वास आहे. त्यांनी ज्या-ज्या ठिकाणी विहिरी निर्माण केल्या, त्या अनेक ठिकाणी आजही गोड पाणी उपलब्ध असल्याचे अनुभव भक्त सांगतात.श्रीक्षेत्र अंतरगावसारख्या पाण्याच्या तीव्र टंचाईग्रस्त भागातही महाराजांच्या कृपेने जलसमृद्धी निर्माण झाल्याचे मानले जाते. त्यामुळे त्या परिसरात आज “जलम् सुफलाम्” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.आज महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये श्री परमहंस परशराम महाराजांची 26 मंदिरे भक्तांच्या श्रद्धेची केंद्रे बनली आहेत.इ.स. 1951 मध्ये होळी पौर्णिमेच्या पावन दिवशी संतश्रेष्ठ श्री परमहंस परशराम महाराजांनी वैकुंठगमन (महासमाधी) केले. त्यानंतर श्रीक्षेत्र पिंपळोद, तालुका दर्यापूर, जिल्हा अमरावती येथे त्यांची पवित्र समाधी उभारण्यात आली. आज हे समाधीस्थळ हजारो भक्तांचे श्रद्धास्थान आहे.दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला जन्मोत्सव आणि होळी पौर्णिमेला पुण्यतिथी अत्यंत भक्तिभावाने साजरी केली जाते. अनेक ठिकाणी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त होळीचा उत्सव न साजरा करता भजन, कीर्तन, नामस्मरण, महिमाग्रंथाचे पारायण आणि महाप्रसादाचे आयोजन करून भक्त त्यांना भावपूर्ण अभिवादन करतात.महाराजांचे जीवनकार्य जतन करण्यासाठी त्यांच्या चरित्राचा 21 अध्यायांचा महिमाग्रंथ प्रकाशित करण्यात आला आहे. या ग्रंथाचे दर महिन्याला मासिक पारायण तसेच विविध ठिकाणी सामूहिक पारायण आयोजित केले जाते. श्रीक्षेत्र पंढरपूर, श्रीक्षेत्र कारंजा लाड, श्रीक्षेत्र कौंडण्यपूर, श्रीक्षेत्र अंबादेवी आणि श्रीक्षेत्र शेगाव येथे मोठ्या प्रमाणात सामूहिक पारायण सोहळे यशस्वीरीत्या संपन्न झाले आहेत. भविष्यात महाराष्ट्रासह संपूर्ण देशभर हे आध्यात्मिक कार्य अधिक व्यापक स्वरूपात पोहोचविण्याचा सेवाधारी परिवाराचा संकल्प आहे.संतश्रेष्ठ श्री परमहंस परशराम महाराजांनी आपल्या जीवनातून श्रद्धा, सेवा, सदाचार, मानवता, करुणा आणि ईश्वरभक्ती यांचा अमूल्य संदेश दिला. त्यांची शिकवण, त्यांचे लोककल्याणकारी कार्य आणि त्यांची दिव्य परंपरा आजही लाखो भक्तांना प्रेरणा देत आहे. श्रीक्षेत्र पिंपळोद येथील पवित्र समाधी, विविध मंदिरांमधील अखंड भक्तीपरंपरा आणि महिमाग्रंथाच्या पारायणातून महाराजांची कृपा व विचार पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचत आहेत.
“मानवसेवा हीच ईश्वरसेवा” या भावनेचा जिवंत आदर्श ठरलेले संतश्रेष्ठ श्री परमहंस परशराम महाराज यांचे कार्य महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील एक तेजस्वी अध्याय असून, त्यांच्या पवित्र स्मृती आणि शिकवणी युगानुयुगे समाजाला प्रेरणा देत राहतील.
