बाजारपेठांमध्ये भाजी खरेदीसाठी नागरिकांची गर्दी
नांदगाव खंडेश्वर/उत्तम ब्राम्हणवाडे
लांबलेल्या पावसाने बाजारात आलेल्या भाज्या महागल्यामुळे शाकाहारी असलेले अन्न पदार्थ तसेच भाजीपाला आपोआपच महाग झाले.शाकाहार जेवण चविष्ट बनविण्यांऱ्या भाज्या महागल्यामुळे शाकाहाराची चवच गायब झाली होती, मात्र आता शहरात व ग्रामीण भागात रानभाज्या बाजारात दाखल होऊ लागल्यामुळे शाकाहारींना खूप मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागालगतच्या रानातून आणि डोंगर भागातुन आलेली कंटोलीसह इतर गुणकारी रानभाज्या बाजारात हळूहळू दाखल होऊ लागल्या आहेत.पावसाळा सुरू झाला की आठवडाभरात या रानभाज्या बाजारात दाखल होतात. वर्षातून फक्त दोन महिने मिळणाऱ्या रानभाज्यांचा आस्वाद घेण्यासाठी गरीब, मध्यमवर्गीय व उच्चभ्रू घरातीलसुद्धा लोकांचा या भाज्या खरेदी करण्याकडे कल असतो. शाकाहाराबरोबरच मांसाहारी लोकही या भाज्या आवर्जून खरेदी करताना दिसतात.गावागावांत बहुतेकांना या रानभाज्यांची माहिती असल्याने पावसाळी हंगामात रोज त्यांच्या जेवणात एखादी लज्जतदार रानभाजी असतेच.पाऊस सुरू झाल्याने माळरानावर व जंगलात विविध औषधी भाज्या उगवतात. तरोटा, शेवळे, टाकळा, कोळा, भारंगा, कंटोळी, कुडी, आकूर, कुलू आदी औषधी व गुणकारी भाज्या आदिवासी महिलांबरोबरच इतर समाजातील कुटुंबांना रोजगार मिळवून देतात. या भाज्यांना बाजारात मागणी असून या विक्रीतून दिवसाला ३०० ते ४०० रुपये मिळत असल्याचे येथील भाजी विक्रेत्यांनी सांगितले. रानात उगविणाऱ्या या भाज्या विविध विकारांवर गुणकारी असल्याचे मानले जाते. वयोवृद्ध माणसे या भाज्या वर्षातून एकदा तरी खाव्यात यासाठी आग्रही असतात.

गावठी भाज्यांना पसंती
हातावर पोट असणाऱ्यांसाठी व वर्षभर गावठी भाजी विकणाऱ्यांसाठी हा काळ पर्वणी ठरतो. निसर्ग स्वतःच ही भाजी पिकवून देत असल्यामुळे कोणताही खर्च न करता केवळ कष्टाने भाजी मिळवून ती बाजारात आणावी लागते. या रानभाज्या औषधी व गुणकारी असल्याने त्या खरेदीसाठी खवय्यांची, नागरिकांनी नेहमी गर्दी पाहावयास मिळते. निसर्गात मिळणाऱ्या व ऋतू मानानुसार मिळणारी फळे, पालेभाज्या खाव्यात असे तज्ञ डॉक्टर वेळोवेळी सांगत असतात. त्यामुळे नागरिकांचा ओढा नैसर्गिक पालेभाज्या, गावठी भाजीपाला घेण्याकडे मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
