शुभम परळीकर व राहुल हजारे यांच्या पाठपुराव्याला यश
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
चांदूर रेल्वे तालुक्यासह नांदगाव खंडेश्वर परिसरातील नागरिक, विद्यार्थी, भाविक व प्रवाशांच्या सोयीसाठी चांदूर रेल्वे–शेगाव थेट एसटी बससेवा बुधवार, १६ सप्टेंबर २०२६ पासून सुरू करण्यात आली आहे. या बससेवेमुळे शेगाव येथे जाणाऱ्या भाविकांसह परिसरातील नागरिकांना थेट प्रवासाची सुविधा उपलब्ध झाली आहे.या बससेवेसाठी युवासेना जिल्हाप्रमुख शुभम परळीकर यांनी महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री मा. प्रतापराव सरनाईक यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे मागणी केली होती.
तसेच राहुल हजारे यांनीही या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा व सहकार्य केले.प्रवाशांची मागणी आणि परिसरातील वाहतुकीची गरज लक्षात घेऊन चांदूर रेल्वे–शेगाव थेट बससेवा सुरू करण्यात आल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. या बससेवेमुळे चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर तसेच परिसरातील नागरिकांना शेगाव येथील श्री संत गजानन महाराज मंदिरात दर्शनासाठी जाणे अधिक सुलभ होणार आहे.

दरम्यान, शिंगणापूर फाटा येथे शिवाई व सुपरफास्ट बससेवांसाठी अधिकृत थांबा देण्याच्या मागणीसह नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील नागरिकांसाठी कारंजा लाड–अकोला–शेगाव मार्गावर थेट बससेवा सुरू करण्याबाबतही पाठपुरावा करण्यात आला आहे. या मागण्यांनाही सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे सांगण्यात आले.चांदूर रेल्वे–शेगाव थेट बससेवा सुरू झाल्याबद्दल नागरिकांकडून परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांचे आभार व्यक्त करण्यात येत असून मागणीसाठी पाठपुरावा करणारे शुभम परळीकर व राहुल हजारे यांचेही अभिनंदन करण्यात येत आहे.
