अमरावती /जिल्हा प्रतिनिधी
श्री निळकंठेश्वर देवस्थान, बुधवारा, अमरावती येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रावण महिन्यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. श्रावण महिन्याच्या प्रारंभापासून मंदिरात नित्य दिनअभिषेकासह विविध कार्यक्रम भक्तिभावाने पार पडले.

महोत्सवाच्या निमित्ताने महिला भजन, शिवमहिम्न स्तोत्र पठण, स्तोत्र पठण, हरिपाठ, भजन संध्या, संगीत संध्या तसेच काल्याचे कीर्तन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महिला भजनाचे आयोजन विठ्ठल-रुक्मिणी महिला भजन मंडळ, वनश्री फॉरेस्ट कॉलनी, साईनगर यांच्या वतीने करण्यात आले. तसेच सुमई संगीत क्लासेसच्या वतीने श्री. अतुलजी भातुकुलकर सर व सरस्वती संगीत क्लास च्या सौ मीनल फुकटे व विद्यार्थ्यांनी संगीत सेवा सादर केली.श्रावण महोत्सवाच्या सांगतेनिमित्त शुक्रवार, ११ सप्टेंबर रोजी काल्याचे कीर्तन आयोजित करण्यात आले. यावेळी ह.भ.प. श्री. गणेश महाराज खंडार यांनी कीर्तनसेवा सादर केली. त्यांना मनोज भाऊ संभे, बंडू सिंग ठाकूर, विजयराव दारोकार, आकाश खंडार, रोशन पंधरे (मृदंगाचार्य), अंश वाठ, रमेश खंडार, चंद्रकांत मोहोड आणि सुनील वानखडे यांनी साथ दिली. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कीर्तनाचा लाभ घेतला.या महोत्सवाचे आणखी एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी श्री निळकंठेश्वर देवस्थानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही आर्थिक मदत करण्यात आली. यामध्ये यश बाळापुरे, मनस्वी खंडार आणि कुमारी पताकी या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देण्यात आली. धार्मिक उत्सवाला सामाजिक बांधिलकीची जोड देत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.काल्याच्या कीर्तनानंतर आयोजित महाप्रसादाने श्रावण महोत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता झाली. संपूर्ण श्रावण महिन्यात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.या संपूर्ण उत्सवाचे आयोजन श्री निळकंठेश्वर देवस्थान, श्री शिव पंचायतन संस्थान, बुधवारा, अमरावती यांच्या वतीने करण्यात आले. उत्सव यशस्वी करण्यासाठी देवस्थानचे विश्वस्त, पदाधिकारी, सेवेकरी आणि भक्तगण यांनी परिश्रम घेतले.देवस्थानचे अध्यक्ष श्री जयंतराव पुसदकर यांनी आभार मानले
