नांदगावकरांना सार्वजनिक बांधकाम विभागाचा बडनेरा हेलपाटा!
नागरिकांच्या सोयीपेक्षा अधिकाऱ्यांची सोय महत्त्वाची? लोकप्रतिनिधींचे मौन संशयास्पद
नांदगाव खंडेश्वर /उत्तम ब्राम्हणवाडे
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील नागरिकांच्या दैनंदिन प्रशासकीय कामकाजाशी संबंधित असलेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय मात्र तालुक्याच्या ठिकाणी नसून तब्बल २८ किलोमीटर अंतरावर असलेल्या बडनेरा येथे सुरू आहे. तालुक्यातील जवळपास सर्वच प्रमुख शासकीय कार्यालये नांदगाव खंडेश्वर येथे असताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय बडनेरा येथेच का ठेवण्यात आले आहे, हा प्रश्न आता नागरिकांच्या संतापाचा विषय ठरत आहे. या बाबत या विभागाच्या लोकप्रतिनिधींची भूमिका मात्र संशयास्पद असल्याचे दिसून येत आहे.
विशेष म्हणजे अमरावती येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय असताना नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील नागरिकांसाठी बडनेरा येथे कार्यालय ठेवण्याचे नेमके औचित्य काय? हा प्रश्न प्रशासनाच्या कारभारावरच बोट ठेवणारा आहे. नागरिकांच्या सोयीसाठी शासनाची यंत्रणा असताना नागरिकांनाच २८ किलोमीटरचा प्रवास करून कार्यालय गाठावे लागत असल्याने ही व्यवस्था नेमकी कोणाच्या सोयीसाठी आहे.असा सवाल उपस्थित होत आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्याचा आवाका फार मोठा असून या तालुक्यातील रस्ते,पूल,शासकीय इमारती आणि सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित विविध कामांसाठी तालुक्यातील नागरिकांना २८ किमी असलेल्या बडनेऱ्याची वारंवार चक्कर मारावी लागते. त्यात कार्यालयात गेल्यानंतर अधिकारी भेटतीलच याची शाश्वती नसते. अधिकारी उपलब्ध नसल्यास नागरिकांना पुन्हा माघारी फिरावे लागते आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच प्रवास करावा लागतो. त्यामुळे एक काम करण्यासाठी नागरिकांनी किती फेऱ्या मारायच्या? असा संतप्त सवाल आता नागरिकांकडूनच व्यक्त केला जात आहे.
२७ वर्षांचा पाठपुरावा; तरीही शासनाच्या दप्तरी मागणी धूळ खात!
सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय नांदगाव खंडेश्वर येथे सुरू करण्यात यावे, यासाठी सन १९९९ पासून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. तब्बल २७ वर्षे उलटूनही या मागणीवर ठोस निर्णय झालेला नाही. एवढ्या प्रदीर्घ कालावधीत अनेक अधिकारी आले आणि गेले, अनेक लोकप्रतिनिधी निवडून आलेत मात्र नांदगावकरांचा हा मूलभूत प्रश्न आजही जैसे थेच आहे.नागरिकांच्या वेळेचा, पैशांचा आणि श्रमांचा विचार करण्याऐवजी कार्यालय बडनेरा येथेच सुरू ठेवण्याचा अट्टहास का केला जात आहे,याचे उत्तर प्रशासनाने देणे गरजेचे आहे. कार्यालय नागरिकांच्या सोयीसाठी आहे की अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी? हा साधा प्रश्न आता नांदगावकर विचारत आहेत.

अधिकाऱ्यांच्या सोयीचा आरोप; लोकप्रतिनिधींचे मौन संशय वाढविणारे
सां.बा.विभागाचे कार्यालय बडनेरा येथेच सुरू ठेवण्यामागे नागरिकांच्या सोयीपेक्षा अधिकारी आणि-कर्मचाऱ्यांच्या सोयीला प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. हा आरोप खरा की खोटा, हे स्पष्ट करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. मात्र १९९९ पासून मागणी करूनही सदर कार्यालय नांदगाव खंडेश्वर येथे आणण्यासाठी ठोस निर्णय होत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.दुसरीकडे एवढ्या वर्षांपासून नागरिकांची गैरसोय सुरू असतानाही तालुक्यातील, विभागातील लोकप्रतिनिधी हा प्रश्न शासन दरबारी प्रभावीपणे का मांडत नाहीत असा सवालही उपस्थित होत आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी नेमके कोणाच्या बाजूने आहेत? असा संतप्त सवाल आता नागरिकांमधून उपस्थित होत आहे.नागरिकांचा वेळ,पैसा आणि श्रम वाचविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय तातडीने नांदगाव खंडेश्वर येथे सुरू करावे तसेच १९९९ पासून प्रलंबित असलेल्या मागणीवर शासनाने अंतिम निर्णय घ्यावा, अशी मागणी तालुक्यातून होत आहे.अन्यथा या प्रश्नावर नागरिकांचा असंतोष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
